Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग काम पूर्णत्वासाठी जानेवारी २०२६ ही नवी डेडलाईन
esakal March 18, 2025 01:45 AM

कणकवली - मुंबई ते गोवा महामार्ग मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सरकारकडून दिली होती; परंतु चौपदरीकरण कामाची गती धीमी राहिल्याने यंदा शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना बारा ते पंधरा तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. आता राज्याने जानेवारी २०२६ अशी महामार्ग पूर्णत्वाची नवीन तारीख दिली आहे; मात्र कामाची गती पाहता चौपदरीकरण पूर्णत्वासाठी आणखी दोन वर्षे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास खडतरच राहण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या चौपदरीकरण कामाचा प्रारंभ २०११ मध्ये झाला; मात्र पुढील दहा वर्षांत चौपदरीकरण कामाची गती अत्यंत धीमी राहिली. त्यामुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये पळस्पे ते कासू या टप्प्याच्या कामासाठी नवा ठेकेदार नियुक्त करण्यात आला. कासू ते इंदापूर या टप्प्याच्या कामासाठी जानेवारी २०२३ मध्ये नवा ठेकेदार नियुक्त केला.

या दोन्ही ठेकेदारांकडून सध्या वेगाने काम सुरू असले तरी पळस्पे इंदापूरपर्यंत अनेक गावांतील ओव्हरब्रीज, तसेच इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्ता, तसेच माणगाव आणि इंदापूर शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामध्ये चाकरमान्यांना चार ते पाच तास नाहक अडकून पडावे लागत आहे.

महामार्ग चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते झाराप या कामाला २०१३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर भूसंपादनातील अडथळे दूर होऊन २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. यात झाराप ते लांजा हद्दीपर्यंत चौपदरीकरणाचे काम मे २०२० पर्यंत पूर्ण झाले; परंतु लांजा ते इंदापूर या दरम्यानच्या अनेक गावांमधील भूसंपादन, राजकीय हस्तक्षेप हे प्रश्न मार्गी काढण्यात राज्यकर्त्यांना अपयश आले. त्यामुळे गेल्या चौदा वर्षांत राज्यातील सरकारे बदलली, तरी चौपदरीकरणाची गती धीमीच राहिली आहे.

जनआक्रोश समितीकडून डेडलाईनची होळी

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाबाबत दहा वर्षांत राज्याकडून अनेकदा ‘डेडलाईन’ दिल्या. प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी मात्र शासकीय पातळीवर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. यात महामार्ग रखडला असून त्याचा मोठा त्रास चाकरमान्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे १३ मार्चला महामार्ग जनआक्रोश समितीने पळस्पे ते लांजा दरम्यानच्या १५ ठिकाणी सरकार आणि प्रशासनाच्या नावे शिमगा करत होळी पेटवून निषेध केल्याची माहिती अध्यक्ष अजय यादव यांनी दिली.

चौदा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला असून याचा मोठा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्गातील उद्योग क्षेत्राला बसत आहे. आताही शासनाने रत्नागिरी जिल्ह्यात ९३६.२५ कोटींचे ५२ उद्योग आणि सिंधुदुर्गात ३१३.५६ कोटींचे ४३ उद्योग प्रस्तावित केले आहेत. या उद्योगातून रत्नागिरीत १ हजार १२५ आणि सिंधुदुर्गात ८७२ थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तातडीने महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून हे उद्योग इथे सुरू व्हावेत.

- स्मिता कदम, सामाजिक कार्यकर्त्या

महामार्ग चौपदरीकरणात रखडलेली ठिकाणे

* कासू ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम ८० टक्के पूर्णत्वास गेले असले तरी उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, लोणेरे, टेमपाले, गांधारपाले, धामणदेवी आदी गावांतील चौपदरीकरण काम अपूर्ण आहे. यात कासू ते वाकणदरम्यानच्या मार्गावर अद्यापही पेव्हर ब्लॉक आहेत.

* इंदापूर ते वडपाले या टप्प्यात माणगाव आणि इंदापूर शहर, तसेच तेथील बाजारपेठांमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. रोज चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. या दोन्ही गावांसाठी बायपास मंजूर आहेत. या बायपास कामांसाठी पाच वर्षांत तीन ठेकेदार बदलले. कोकण रेल्वे, वनविभाग आदींच्या परवानग्याही मिळाल्या; मात्र भूसंपादनाचा प्रश्न सुटत नसल्याने बायपास रस्त्यांची कामे अद्यापही सुरू झाली नाहीत.

*कशेडी ते लांजा या टप्प्यातील खेड रेल्वेस्थानक पुलाचे काम अपूर्ण आहे. परशुराम घाटातील कामही अद्याप शिल्लक आहे. चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. पाली शहरातही उड्डाणपुलाचे केवळ खांब उभारले आहेत, तर हातखांबा येथील उड्डाणपुलाची गती अत्यंत धीमी आहे. तसेच संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचेही काम धीम्या गतीने सुरू आहे.

अशा मिळाल्या डेडलाईन

१) तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील - डिसेंबर २०१९

२) तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण - डिसेंबर २०२०

३) तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण - डिसेंबर २०२३

४) विद्यमान बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले - जानेवारी २०२६

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.