आबलोलीत स्वच्छता मोहीम
विद्यार्थ्यांचा सहभाग ; परिसर चकाचक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ : गुहागर तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता नवलाईदेवींच्या तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शिमगोत्सवानंतर आबलोली येथील बाईत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसराची साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावली.
आबलोली, खोडदे गावातील सर्व समाजातील लोक फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर गावचे खोत, मानकरी, गावकर यांचे हस्ते होम पेटविले जातात व दुपारनंतर आबलोली येथील नवलाईदेवी, खोडदे गणेशवाडी येथील नवलाईदेवी, सहाणेचीवाडी येथील नवलाईदेवी या तिन्ही बहिणींची गळाभेट कारेकर यांच्या जागेतील मैदानात झाली. या उत्सव सोहळ्यात सहाणेजवळील जागेत जत्रा भरते. महिला, पुरुष आणि लहान मुले खाऊची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या पाणी बॉटल आणि अन्य कचरा या परिसरात पडलेला असतो. हा कचरा दुसऱ्या दिवशी आबलोली येथील बाईत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत उचलला. त्यामुळे परिसर स्वच्छ झाला. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.