दिघेवाडी आदिवासीवाडीतील कर्तृत्व महिलांचा सन्मान
पाली, ता. १७ (वार्ताहर) ः महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेतर्फे दिघेवाडी आदिवासीवाडी येथे नुकताच कातकरी समाजातील सुशिक्षित व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षिका काळे, माजी सरपंच संजना वाघमारे, अंगणवाडीसेविका व मदतनीस संचिता पवार, सुषमा पवार आणि मयुरी पवार यांची प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विशेष उपस्थिती होती.
या वेळी आयोजित परिसंवादामध्ये महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेच्या प्रकल्प सहाय्यक ममता रावते यांनी प्रमुख पाहुण्यांशी संवाद साधला. संविधान अभ्यासक व अंगणवाडी मदतनीस सुषमा पवार यांनी महिलांसाठी असलेल्या योजना व कायदे याची माहिती सांगून अतिशय ओघवत्या शैलीत कविता व ऐतिहासिक दाखले देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. संचिता पवार यांनी कुटुंबीयांनी शिक्षण व कामात दिलेला पाठिंबा सांगून महिलांना पुढे जाण्यासाठी फक्त विश्वासाची गरज असल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षिका काळे यांनीदेखील शिक्षकांच्या आर्थिक पाठिंब्याने पूर्ण झालेले शिक्षण व आता नोकरी करताना नवऱ्याने दिलेला पाठिंबा कसा महत्त्वाचा आहे, हे सांगून महिलांच्या सद्यःस्थितीबाबत मांडणी केली. प्रकल्प समन्वयक सतीश शिर्के यांनी महिलेच्या पायात कोणत्या प्रकारच्या बेड्या आहेत, त्या कशा पद्धतीने तोडल्या पाहिजे, आवश्यक तिथे बंड करून, सहकारी पुरुषाला सोबत घेऊन पुढे जायला हवे, हे गाण्याच्या माध्यमातून सांगितले. हा कार्यक्रम प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेच्या प्रेरणा सखी रोशनी वाघमारे, समीरा जाधव, प्रकल्प सहाय्यक ममता रावते, विलास भुसारे आणि सिद्धेश आडकर यांनी उत्तम नियोजन केले. सोबतच दिघेवाडी आदिवासीवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले.