वसई: वसई-विरारमधील अनेक नागरिक प्रवासासाठी महापालिकेच्या परिवहन सेवेला प्राधान्य देतात. प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रवाशांना सुखद गारेगार प्रवास करता येणार आहे.
वसई-विरार महापालिकेने सुरू केलेली परिवहन सेवा प्रवाशांना सुविधा देत आहे. औद्योगिक वसाहतीत रोज हजारो प्रवासी जात असतात. त्यांना सकाळी आणि सायंकाळी परिवहन सेवेची सुविधा मिळत असल्याने त्यांचा कल या बसकडे आहे. सद्य:स्थितीत इंधनावर चालणाऱ्या एकूण ११४ बस आहेत. या ताफ्यात ४० ई-बस आल्या असून, त्यातील २० बसची सेवा सुरू झाली आहे. तर अन्य २० बसदेखील तांत्रिक प्रक्रिया पार पडल्यावर लवकरच धावणार आहेत. यावर्षी केंद्र सरकारच्या अन्य नवीन ई-बसची भर पडणार आहे.
परिवहन सेवांतर्गत नागरिकांना विविध सवलती देण्यात येतात. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना, तसेच डायलिसिस रुग्णांना मोफत प्रवास करता येणे शक्य होत आहे. त्यामुळे या बसचा आधार घेतला जात आहे. नव्याने आलेल्या ई-बससाठी अधिकाधिक चार्जिंग स्थानक उभे केले जात असून प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पालिकेकडून निधी खर्च केला जाणार आहे.
ई-बससाठी लवकरच मार्गिकाई-बस चार्जिंग स्टेशन, तसेच इतर अनुषंगिक खर्चाकरिता मुख्य निधीमधून परिवहन उपक्रमाला केंद्राच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत वसई-विरार महापालिकेत ४० ई-बस आल्या आहेत. त्यांची मार्गिका लवकरच निश्चित केली जाणार आहे.
परिवहनसाठी ५५ कोटीने वाढपरिवहन सेवांतर्गत नागरिकांना विविध सवलती देण्यात येतात. ई-बस चार्जिंग स्टेशन, तसेच इतर अनुषंगिक खर्चाकरिता २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ८० कोटी तरतूद करण्यात आली आहे. या निधीत गतवर्षीपेक्षा ५५ कोटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सीसीटीव्हीची नजरमहिलांच्या सुरक्षेसाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नव्याने प्रत्येक बसला सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे या तिसऱ्या डोळ्याची नजर प्रवाशांना सुरक्षेचा विश्वास देत आहे. यासह अन्य सुविधादेखील विभागाकडून लवकरच दिल्या जाणार आहेत.
चार्जिंग स्टेशनसाठी प्रयत्नविरार पश्चिमेला यशवंत नगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे, तर वसई पूर्वेला दोन आणि नालासोपारा पश्चिमेला एक चार्जिंग स्टेशनची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे ई-बस विना अडसर मार्गावर धावणार आहेत.
महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच पर्यावरणपूरक बसदेखील सेवेत आल्या आहेत. लवकरच त्यांची संख्या वाढणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
परिवहन सेवेच्या २० ई-बस सुरू झाल्या असून, अर्नाळा, नालासोपारा मार्गावर धावत आहेत. पर्यावरणपूरक आणि आरामदायी सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अन्य बसदेखील लवकरच सेवा देणार आहेत.
- रविकिरण शेरेकर, व्यवस्थापक, परिवहन सेवा