Pune News : ज्येष्ठ दाम्पत्याला सुखद धक्का; परत मिळाले अकरा लाखांचे दागिने
esakal March 18, 2025 06:45 AM

पुणे - मध्य प्रदेशातील ज्येष्ठ दांपत्य पुणे रेल्वे स्थानकावर उतरले. तेव्हा बॅगेतील साडेअकरा लाखांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. मौल्यवान दागिने चोरीस गेल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी चोरट्यांना शोधून काढण्याचा आदेश दिला.

लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकासह हरियानापर्यंत दीडशेहून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. खबऱ्याची मदत घेत पोलिसांनी चोरट्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दहा लाख ९३ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. हे दागिने ज्येष्ठ दाम्पत्याला परत मिळवून दिल्याने त्यांना सुखद धक्का बसला.

याबाबत ज्येष्ठ नागरिकाने (वय-७३, रा. आनंदपुरा, देवास, मध्य प्रदेश) लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सुमीतकुमार सतवरसिंह (वय-३०, रा. सुलतानपुरी, दिल्ली, मूळ रा. भवानी खेडा, हरियाना) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्य एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, देवासमधील ज्येष्ठ दांपत्य १३ जानेवारीला इंदूर-पुणे रेल्वेतून प्रवास करत होते. पुणे रेल्वे स्थानकावर बॅगेतून साडेअकरा लाखांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी बिपिन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात दोघा चोरट्यांपैकी एकजण साधू वासवानी पुलाच्या दिशेने गेला होता. त्यानंतर ते घोरपडीत एकत्रित दिसून आले. पोलिसांना तपासात एक लिंक सापडली. चोरट्यांचे वर्णन देशभरातील रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. बंगळूर रेल्वे पोलिसांनी एकाला सात वर्षांपूर्वी ताब्यात घेतले होते. या माहितीवरून पोलिस हरियानात दाखल झाले. परंतु तो तेथे आढळून आला नाही.

त्याने वळून पाहिले अन॒ पोलिसांना सापडला -

दुसरा आरोपी सुमीतकुमारची मैत्रीण दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलिस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, कदम, दांगट, टेके, बिडकर, केंद्रे, वाघमारे सात दिवस दबा धरून होते. त्यांना चोरट्याचा मिळताजुळता चेहरा असलेला तरुण दिसला. पोलिसांनी त्याला सुमीतकुमार अशी हाक मारली.

त्याने वळून पाहताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला घोरपडी रेल्वे यार्ड परिसरात आणून चौकशी केली. त्याच्याकडून दहा लाख ९३ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ज्येष्ठ दाम्पत्याला ते दागिने परत करण्यात आले. दागिने परत मिळाल्याने ज्येष्ठ दाम्पत्याला आनंद झाला. त्यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.