इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिलाच सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानात खेळवला जाणार आहे.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेत गतविजेते म्हणून उतरणार असले तरी संघात मेगा ऑक्शनमुळे मोठेबदल झाले आहेत.
कोलकाताने गेल्यावर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी गौतम गंभीर मेंटॉर होता. मात्र आता श्रेयस अय्यरसह गंभीरही संघाचा भाग नाही. याशिवाय गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमधील अनेक सदस्य देखील यंदा संघाचा भाग नाहीत. त्यामुळे नव्या कर्णधारासह नव्या उमेदीने कोलकाताला मैदानात उतरावं लागणार आहे.
कोलकाताने यावेळी अनुभवी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे, तर उपकर्णधार म्हणून वेंकटेश अय्यरची नियुक्ती केली आहे. रहाणेचा हा या संघासोबतचा दुसरा कार्यकाळ आहे. तो २०२२ मध्ये या संघाचा भाग होता, त्यावेळी त्याने ७ सामन्यात १३३ धावा केल्या होत्या.
आता मात्र तो या संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. आधीच संघ गतविजेता असल्याने आता रहाणेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. रहाणेने नजीकच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतीलही सर्वोत्तम खेळाडू होता.
संघाची ताकदरिंकु सिंग (१३ कोटी), वरूण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नारायण (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी) आणि रमणदीप सिंग (४ कोटी) या खेळाडूंना रिटेन केले होते. तसेच वेंकटेश अय्यरलाही त्यांनी तब्बल २३.७५ कोटी खर्च करत संघात घेतले आहे.
तसेच रेहमनुल्लाह गुरबाजलाही परत संघात घेण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या संघातील आठ प्रमुख खेळाडू त्यांच्या आत्ताच्या संघात आहेत. ही संघासाठी जमेची बाजू आहे.
नारायण आणि रसेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोलकातासाठी मोलाची भूमिका निभावली आहे, ती अपेक्षा यंदाही संघाला त्यांच्याकडून असणार आहे. नारायण यावेळीही सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. तसेच रसेल अष्टपैलू म्हणून महत्त्वाचा राहणार आहे.
याशिवाय वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी ही कोलकातासाठी अत्यंत जमेची बाजू असणार आहे. चक्रवर्ती गेल्या गेल्या काही महिन्यांपासून अफलातून गोलंदाजी करत आहे. त्याला हर्षित राणाकडूनही साथ मिळू शकते. रिंकूला यंदा फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.
कमकुवत बाजूकोलकाताकडे चांगली फलंदाजी असली, तरी यंदा त्यांच्या गोलंदाजीत अनुभवतेची कमी जाणवत आहे. संघात चक्रवर्ती, हर्षित राणा आहेत. त्यांना साथ देण्यासाठी रसेल आणि नारायणही आहेत. तसेच संघात एन्रिक नॉर्किया आहे. मात्र, त्याला दुखापतींची जोखीम आहे.
याशिवाय रसेल आणि नारायण प्लेइंग इलेव्हनमधये असतील, हे गृहित धरले, तर आणखी दोनच परदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी कोलकाताला मिळेल, अशात जर गुरबाज आणि मोईन अलीला संघात स्थान दिले, तर वेगवान गोलंदाजीत परदेशी खेळाडूची कमी जाणवू शकते.
गेल्यावर्षी ही कमी मिचेल स्टार्कने भरून काढली होती. त्याची गोलंदाजी मोक्याच्या क्षणी महत्त्वाची ठरली होती. अशात आता गोलंदाजीचं संमिश्रण कोलकाताकडून कसे केले जाणार, हे पाहावे लागणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघरिटेन केलेले खेळाडू - रिंकु सिंग (१३ कोटी), वरूण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नारायण (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी) आणि रमणदीप सिंग (४ कोटी)
लिलावातून घेतलेले खेळाडू - वेंकटेश अय्यर (२३.७५ कोटी), एन्रिच नॉर्किया (६.५० कोटी), क्विंटन डी कॉक (३.६० कोटी), अंगक्रिश रघुवंशी (३ कोटी), रेहमनुल्ला गुरबाज (२ कोटी), वैभव अरोरा (१.८० कोटी), मयंक मार्कंडे (३० लाख), स्पेन्सर्स जॉन्सन (२.८० कोटी), मोईन अली (२ कोटी), अजिंक्य रहाणे (१.५० कोटी), रोवमन पॉवेल (१.५० कोटी), उमरान मलिक (७५ लाख), मनिष पांडे (७५ लाख), अनुकूल रॉय (४० लाख), लुवनिथ सिसोदिया (३० लाख)
कोलकाता नाईट रायडर्सचे वेळापत्रक२२ मार्च - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता (संध्या. ७.३० वा)
२६ मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, गुवाहाटी (संध्या. ७.३० वा)
३१ मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई (संध्या. ७.३० वा)
३ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (संध्या. ७.३० वा)
६ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता (दु. ३.३० वा)
११ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई (संध्या. ७.३० वा)
१५ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चंदिगढ (संध्या. ७.३० वा)
२१ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, कोलकाता (संध्या. ७.३० वा)
२६ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता (संध्या. ७.३० वा)
२९ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली (संध्या. ७.३० वा)
४ मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोलकाता (दु. ३.३० वा)
७ मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता (संध्या. ७.३० वा)
१० मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, हैदराबाद (संध्या. ७.३० वा)
१७ मे - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (संध्या. ७.३० वा)