Shirdi Airport : थरारक! विमानतळावर बिबट्यांचा वावर; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धडकी भरवणारा VIDEO समोर
Saam TV March 18, 2025 06:45 AM

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मादीने पिल्लांसह डेरा टाकल्याचे व्हिडिओ साम टीव्हीने समोर आणले आहेत. वन अधिकाऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओ बाबत पुष्टी करत उपाययोजना सुरू केल्याचं सांगितलं आहे. मात्र रनवे परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी विमानाने देशविदेशातून दररोज शेडको भाविक शिर्डीत येत असतात. मात्र विमानतळावर मोकाट जनावरे आणि बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत असल्याने विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मादी आपल्या पिलांसह विमानतळावर फिरत असतानाचे व्हिडिओ साम टीव्हीने समोर आणलेत. वन अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची पुष्टी करत परीसरात जवळपास पाच पिंजरे लावलेले आहेत. तसेच इतर ठिकाणच्या पथकाचीही मदत घेतली जातेय. विमानतळ प्रशासनाला वन विभागाने संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यास सांगितले आहे.

वनविभागाने आठ महिन्यापूर्वी एका नर बिबट्याला विमानतळावरून जेरबंद केलं आहे. मात्र मादी बिबट्या जेरबंद होऊ शकली नाही. आता या मादीला तीन चार पिल्लेही झालेली आहेत त्यामुळे पिल्लांना पडण्यापूर्वी मादी बिबट्याला पकडावे लागणार असल्याचं वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत.

जर विमान लँडिंगच्या किंवा टेकऑफच्या वेळी रनवेवर आला तर मोठा अपघात होवू शकतो.. मात्र बिबट्या आवाजाला घाबरणारा प्राणी असून विमानाच्या आवाजाने तो रनवेवर येण्याची शक्यता कमी असल्याचं वनअधिकारी म्हणत आहेत.

काहीही असलं तरीही एकाद्या आंतरराष्ट्रीय बिबट्याच्या मुक्त संचारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.. त्यामुळे लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करून सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.