रत्नागिरी - ‘राज्यात पुढील पाच वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्रात ४० लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होईल. त्यासाठी स्किल (कौशल्य) असलेल्या कुशल कामगारांची गरज आहे. रत्नागिरीत झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीच्या कौशल्यवर्धक केंद्राप्रमाणे अनेक केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. यातून मुलांना फक्त प्रमाणपत्र मिळणार नाही, तर कुशल मनुष्यबळामुळे रोजगाराची दारे उघडली जातील,’ असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यात जेवेढे प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी जेवढा निधी लागेल तो दिला जाईल. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. रत्नागिरीतील चंपक मैदान येथे टाटा टेक्नॉलॉजीच्या कौशल्य वर्धक केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘राज्याच्या अर्थसंकल्पावर ७५ आमदारांनी चर्चा केली. कोणी स्वागत केले, कोणी टीका केली. मला खरंतर उत्तर द्यायचे होते; परंतु उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कौशल्यवर्धक केंद्राच्या भूमिपूजनासाठी आग्रह केला. त्यामुळे यावे लागले. १९७ कोटी खर्च करून हे केंद्र उभारले जात आहे. त्यामध्ये ३१ कोटी राज्य शासनाचे आणि १६५ कोटी टाटा समूहाच्या सीएसआर फंडातून मिळाले आहेत.
या केंद्रामुळे रत्नागिरील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे. एवढेच नाही, तर त्यांना कौशल्य विकास होऊन रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण होणार आहेत. रत्नागिरी बदलत आहे. अनेक उद्योग येऊ घातले आहेत. मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे स्थानिक बाजारपेठेवर चांगला परिणाम होईल. रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू केले जाणार आहे. त्याचे टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बदलांमुळे रत्नागिरीचा विकास झपाट्याने होणार आहे.’’
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. टाटा टेक्नॉलॉजीचे कौशल्यवर्धक केंद्र आवश्यक होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानातून दर्जेदार तांत्रिक शिक्षण मुलांना मिळणार आहे. त्यातून त्यांचे ज्ञान वाढेल. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खरतर यांचे सर्व श्रेय हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आहे. मला त्यांचे कौतुक वाटते.
भारतात यापुढे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी अशा केंद्रांची उभारणी करणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघुउद्योगांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि उच्च प्रशिक्षित कामगार यामुळे मिळण्यास मदत होणार आहे. संगमेश्वर कसबा येथे भव्य संभाजी स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी जागामालकांना भेटून जाणार आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, टाटा टेक्नॉलॉजीचे प्रकल्प संचालक केलापूर आदी उपस्थित होते.
प्रदूषणविरहित प्रकल्प
रत्नागिरीला निसर्गाने भरभरून दिले आहे. नैसर्गिक सौंदर्यांची सढळ हस्ते उधळण केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात एकही प्रदूषणकारी प्रकल्प दिला जाणार नाही. प्रदूषणविरहित प्रकल्प दिले जातील, असे आश्वासनही पवार यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्ग...
रेवस ते रेड्डी मार्ग होत आहे, राज्यात अनेक महामार्ग पूर्ण झाले आहेत, काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु एकच मनात खंत आहे ती मुंबई-गोवा महामार्गाची. यापूर्वीचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी मी बोललो होतो. आताचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच तो पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पवार म्हणाले.