देगलूर - वन्नाळी येथील एका खाजगी इंग्रजी स्कूल मधील लहान मुलांसाठी ने-आण करण्यासाठी असणारी ओमिनी गाडीमध्ये गॅस भरताना अचानकपणे आग लागून गाडी जागेवरच भस्मसात झाली. व बाजूस असणारे किराणा दुकानासह एक हॉटेल ऑटोमोबाईल चे दुकान, सिमेंटचे दुकान व एक राहत्या घराला याचा मोठा फटका बसला या आगीत एक मोटरसायकल ही जळून खाक झाली.
या आगीमध्ये जवळपास ५० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून आग विझवताना ओमीनीचा मालक विजय विजय जोरगुलवार हे गंभीर भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी ता. १८ रोजी सायंकाळी सात वाजता नांदेड देगलूर रोडवरील वन्नाळी फाट्यावर घडली.
घटनास्थळी तहसीलदार श्री. भरत सूर्यवंशी, मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. देगलूर व बिलोली येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परिश्रम घेत होते.
या घटनेमुळे नांदेड देगलूर रोडवरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या रांगाच रागा दोन्ही बाजूने लागल्या होत्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, वन्नाळी येथे एक खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी विजय जोरगूलवार यांच्या मालकीची एक ओमिनी कार आहे. सोमवारी ता. १८ रोजी सायंकाळी जोरगुलाल हे कारमध्ये गॅस भरीत असताना अचानक स्फोट होऊन कारने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.
बाजूस असलेले जोरगुलवार यांचे किराणा दुकान, शेख महेबूब साहब यांचे हॉटेल, मनमत भाले यांचे मोबाईल शॉपीचे दुकान, चांदसाब शेख यांचे सिमेंट हार्डवेअरचे दुकान व लखा येथील खलील शेख यांचे मोटार सायकल दुरुस्तीचे असलेले ऑटोमोबाईल चे दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले.
व महेबुब नबी साहब यांच्या राहत्या घरातील दैनंदिन वापराचे साहित्य ही या आगीत जळून खाक झाले. संभाजी कोरेवार यांची मोटरसायकल ही याआगीत जळून खाक झाली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
घटनास्थळी तहसीलदार भरत सूर्यवंशी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून घटनास्थळी हजर होते. बऱ्याच अंशी आग आटोक्यात आली असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.