- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या तंत्रज्ञानाने केवळ उद्योगधंद्यांचे स्वरूप बदलले नाही, तर करिअरच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात करिअरची योग्य निवड करणे ही काळाची गरज बनली आहे. आपण अनेक ठिकाणी वाचतो की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत इत्यादी. यामध्ये थोडे तथ्य ही आहे; परंतु उगाचच घाबरून टाकणारी गोष्ट असा भागही आहे.
डेटा सायन्स आणि डेटा अॅनालिटिक्स
डेटा सायन्स हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील सर्वाधिक मागणी असलेले क्षेत्र आहे. विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होतो, आणि त्याचा अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हे व्यवसायांचे उद्दिष्ट असते. डेटा सायंटिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट यांसारख्या भूमिका विद्यार्थी निवडू शकतात. सोपं करून सांगायचं म्हणजे डेटा वरून माहितीकडे कसं जायचं आणि माहितीवरून ज्ञानाकडे कसं जायचं हे काम महत्त्वाचे आहे.
मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग स्पेशालिस्ट्स
मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग ही कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वाची अंग आहेत. या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ संगणकांना स्वयंचलित शिक्षणाचे तंत्र शिकविण्याचे काम करतात. स्वयंचलित वाहने, स्पीच रेकगनायझेशन आणि फेस रेकगनायझेशन यांसारख्या प्रकल्पांमध्ये या कौशल्यांची मागणी आहे. याचे खूप फायदे आहेत, तसेच दुर्दैव्य असं आहे की डीप लर्निंग हे अनेकदा डीपफेक व्हायला लागले आहे, आपण त्या वाटेने जात नाही ना याची काळजी घ्या.
क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि एआय इंटिग्रेशन
क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेची सेवा अधिक प्रभावी बनल्या आहेत. क्लाऊड आर्किटेक्ट्स, एआय इंजिनिअर्स, आणि क्लाऊड एआय इंटिग्रेशन तज्ज्ञ यांसारख्या भूमिका वेगाने लोकप्रिय होत आहेत.
सायबरसुरक्षा तज्ज्ञ
कृत्रिम बुद्धिमत्ता युगात डेटा सुरक्षेला प्रचंड महत्त्व आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सायबर सुरक्षेत सुधारणा झाल्या असल्या तरीही, सायबर हल्ल्यांचा धोका कायम आहे. त्यामुळे सायबरसुरक्षा तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हॅकिंग हे सगळ्यांना थोडंफार माहीत असते परंतु या क्षेत्रात एथिकल हॅकर हवे असतात, धोरण तयार करण्यासाठी खूप मदत होते.
रोबोटिक्स आणि ऑटोमेशन
उद्योगधंद्यांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर वाढत आहे. उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर हे या क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. रोबोटिक्स इंजिनिअर्ससाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.
निष्कर्ष
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात करिअरच्या संधी अमर्याद आहेत, परंतु त्यासाठी योग्य कौशल्ये आणि तंत्रज्ञानाचे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात तुमची सर्जनशीलता आणि कौशल्ये तुम्हाला यशस्वी करण्याची ताकद देऊ शकतात.