- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली की त्याचा विपर्यास होतो. कुठली गोष्ट किती लावून धरावी हे ठरवणं अवघड असते. हे गणित ज्याला उमगले त्याला यशाची गुरुकिल्ली मिळाली. कुठे थांबायचे हे आपल्याला कळलेच पाहिजे. अभ्यासात, करिअरमध्ये किंवा व्यवसायात भावनात्मक होऊन निर्णय घेणे घातक.
कुणाच्या सल्ल्यावरून आपण ‘डॉक्टर’ बनायचा निर्णय घेतला कदाचित खूप अभ्यास करून होऊ सुद्धा. तरी प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला समाधान मिळेल का? कदाचित तुमचा कल बांधकाम व्यवसायात असेल तर तुम्ही छान घर बनवू शकला असता ज्यात तुम्हाला ही आणि तुमच्या क्लाइंटला काहीतरी चांगले केल्याचा आनंद मिळाला असता. कधी कधी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित क्षमतेच्या बाहेरचाही असू शकतो आणि मग अभ्यास करणे ही अवघड होते. त्यातून मानसिक न्यूनगंड, नैराश्य वाढते.
आपण वेळीच नकार देण्याचे धैर्य दाखविले तर कदाचित कुणाचे मन तात्पुरते दुखावू परंतु पुढील आयुष्य सुकर होईल. नोकरीमध्ये किंवा व्यवसायात असेच आहे. एखादा प्रोजेक्ट कितीही चांगला असेल तरी तो नफा-तोट्याच्या गणितात बसतो की नाही, योग्य निकष परिस्थितीला धरून आहेत की नाही हे बघणे ही आवश्यक आहे.
काही उपक्रम काळानुसार टिकतात किंवा बंद करावे लागतात. ते वेळेत न केल्यास करिअरही उध्वस्त करू शकतात. वेळेत आपले निर्णय भावनेत नाही तर व्यवहारी होऊन बदलणे आवश्यक आहे.
अनेकदा अपयश मान्य करणे अवघड म्हणून आपण प्रयत्न करीत राहतो आणि तिथेच वेळेचा आणि पैशांचा विपर्यास होतो. चूक मान्य करून तिथेच थांबायला शिकणे खूप गरजेचे आहे. आपण कोचिंग क्लासमध्ये पैसे आणि वेळ घातल्याचे कळल्यानंतरही त्याचा अट्टहास टाळला पाहिजे.
पालकांनीही पाल्यांच्या मर्यादा, आवडी लक्षात घेऊन वेळेत त्यांनी मुभा द्यावी म्हणजे भविष्यात देखील असे निर्णय घ्यायचे कौशल्य ते विकसित करू शकतील. या कौशल्याचा वापर दैनंदिन जीवनातही होतो. करिअरमध्ये किंवा व्यवसायात अनेकदा आपण काही निर्णय मनावर दडपण ठेवून, अभिमान बाळगून घेतो आणि नेमके त्याचवेळी व्यवहारातून निर्णय घेणे महत्त्वाचे असते, दोन पाऊल मागे टाकून चार पावले पुढे जाण्यात जास्त शहाणपण आहे.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक ना करता, भावनांच्या भरात निर्णय ना घेता व्यवहारपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. काळाप्रमाणे माणसाला बदलणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कुठले ही उपक्रम बाजारात उपलब्ध नाहीत. हे कौशल्य तुम्हाला अनुभवाने, दुसऱ्यांकडे बघून, समाजात राहून शिकावे लागतील.