Sunita Williams Return Viral Videos : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतले आहेत. 19 मार्चला पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले आणि पॅरॅशूटने लँड झाले. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. या अंतराळवीरांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या; त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत. आता त्यांच्या परतीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत आणि खूप व्हायरल होत आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 5 जून 2024 ला बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाले होते. त्यांची मोहीम केवळ 8 दिवसांची होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांची पृथ्वीवर परती लांबणीवर पडली.
या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने अनेक प्रयत्न केले आणि यापूर्वी दोन वेळा मिशन लॉंच करण्याचे नियोजन झाले; परंतु काही तांत्रिक कारणास्तव ते रद्द झाले. त्यामुळे सुनीता विलियम्सना तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून राहावे लागले. त्या दरम्यान त्यांनी अनेक प्रयोग व संशोधन केले.
या अंतराळवीरांच्या सुखरूप परतीसाठी संपूर्ण जगभर प्रार्थना केली जात होती. आता ते सुखरूप परत आले आहेत त्यामुळे सर्वत्र आनंद साजरा होत आहे. मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी अंतराळात सुनीता विलियम्स यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात आली. आता हे अंतराळवीर जरी पृथ्वीवर परत आले असतील तरीही त्यांना पूर्ववत आयुष्य जगण्यात फार वेळ लागेल. अनेक आजार आणि चालण्याच्या समस्या होऊ शकतात,तसेच डोळ्यांसंबंधित आजार होऊ शकतात.