- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
स्त्रिया घरातील जबाबदाऱ्या, नोकरी आणि कौटुंबिक ताणतणाव यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, त्यांना लहान वयातच दीर्घकालीन आजारांचा सामना करावा लागतो. योग्य दिनचर्या, योग आणि संतुलित आहाराच्या मदतीने ही स्थिती सुधारता येऊ शकते. थायरॉइड विकार आणि पीसीओएसवरील उपाय आपण मागे पाहिलेच आहेत. आता इतर दीर्घकालीन आजार आणि उपाय पाहूयात.
हाडांचे आजार (ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखी) :
कारणे : कॅल्शियम. व्हिटॅमिन डी कमतरता, व्यायामाचा अभाव.
लक्षणे : सांधे, कंबरदुखी, हाडे ठिसूळ होणे.
मधुमेह (Diabetes Type-2) :
कारणे : अनुवांशिकता, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव.
लक्षणे : थकवा, अति भूक किंवा तहान, वजन कमी होणे.
उच्च रक्तदाब, हृदयविकार :
कारणे : वाढता तणाव, जास्त प्रमाणात मीठ आणि तेलयुक्त पदार्थ, व्यायामाचा अभाव.
लक्षणे : डोकेदुखी, अस्वस्थता, छातीत दुखणे.
उपयुक्त योगासने
मकरासन : थायरॉइड आणि मानसिक तणाव कमी करते. रक्ताभिसरण सुधारतो आणि मेंदूला शांती मिळते.
भुजंगासन : पीसीओएसमध्ये फायदेशीर; रक्तसंचार सुधारते. पाठदुखी आणि गॅसच्या समस्येस मदत होते.
धनुरासन : हार्मोनल संतुलन राखते, पीसीओएस आणि थायरॉइडवर फायदेशीर. पचनसंस्था आणि पोटाची चरबी कमी करते.
सेतूबंधासन : हृदयाचे आरोग्य सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. कंबर आणि हाडे बळकट करतो.
उत्कटासन : हाडांची ताकद वाढवते, स्नायू बळकट होतात. वजन संतुलित ठेवण्यास मदत होते.
सुप्त बद्धकोनासन : मासिक पाळीच्या तक्रारी दूर करते. मेंदूला, मनाला शांतता देते.
विपरित करणी आसन : थकवा, तणाव आणि रक्ताभिसरण सुधारतो.
काय खावे?
प्रथिने : डाळी, टोफू, पनीर, मूग, बदाम, अंडी. (स्नायू बळकट करतात आणि हार्मोनल संतुलन राखतात.)
फायबरयुक्त पदार्थ : फळं, भाज्या, नाचणी, ओट्स, बाजरी, जव. (मधुमेह टाळण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी उत्तम.)
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी : दूध, ताक, संत्री, अक्रोड, सूर्यप्रकाश. (हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक.)
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स : जवस, अक्रोड, बदाम. (हृदय निरोगी ठेवते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवते.)
हायड्रेशन आणि डिटॉक्स ड्रिंक्स : कोमट पाणी, लिंबूपाणी, गुळवेल काढा, आल्याचा रस. (शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.)
काय टाळावे?
प्रोसेस्ड फूड (चिप्स, बर्गर, पॅकेज्ड फूड) : हार्मोनल समस्या वाढवतात.
जास्त साखर (कोल्ड्रिंक्स, गोड पदार्थ) : मधुमेह आणि वजनवाढीला कारणीभूत. तळलेले पदार्थ : कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढवतात.