कर्जत हे तालुक्याचं गाव. आसपास असलेल्या ५-५० खेड्यांसाठी कर्जत हे ‘शॅापिंग’चं मुख्य ठिकाण. कर्जत हे अगदी छोटंसं, टुमदार. चारही बाजूंनी उंच पर्वतांनी नटलेलं, निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं गाव. मुख्य बाजारपेठेपासून चारही दिशांना दीड-दोन किलोमीटर गेलं, की मुख्य कर्जत संपतं. जसा प्रत्येक गावाच्या आठवडी बाजाराचा असा एक दिवस ठरलेला असतो, तसा कर्जतचा ‘शुक्रवारचा बाजार’.
या बाजारात जाण्याची मजा फक्त कर्जतकरच सांगू शकतात. इथं तुम्ही म्हणाल त्या वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतात. कपडेलत्ते, चपला, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, लोणची, मसाले, भाजीपाला, कॅास्मेटिक्स, तसंच सीझनप्रमाणे मिळणाऱ्या इतर वस्तू म्हणजे छत्र्या, टोप्या, स्वेटरदेखील इथं अगदीच स्वस्त दरात मिळतात.
या बाजारासाठी माणसं खोपोलीपासून ते अगदी बदलापूरपासूनही येतात. लहान असताना मीही आजीचा हात धरून बाजारात जायचे. आजी पाच-पन्नास रुपये माझ्या हातात ठेवायची आणि मी तेवढ्या पैशांत खूप शॅापिंग करायचे. दर शुक्रवारी कर्जतच्या बाजारपेठेचं रूप काही वेगळंच असतं. एरवी दुपारी दीडनंतर शांत होणारी बाजारपेठ शुक्रवारी मात्र रंगीबेरंगी होऊन जाते.
आसपासच्या ठाकरवाड्यांवरून आणि गावांमधून बरीच कुटुंबं त्यांच्या चिल्यापिल्यांना या बाजाराला आवर्जून घेऊन येतात. फ्लोरोसंट रंगांच्या त्यांच्या साड्या, केसांत मिळतील ती रानफुलं माळलेली, पायात चपला असोत किंवा नसोत, शुक्रवारच्या बाजारातूनच विकत घेतलेल्या गडद रंगांच्या लिपस्टिक नक्की लावलेल्या असतात.
त्यांच्या नवऱ्याच्या खांद्यांवर एखादं गोड सोनेरी केसांचं बाळ हातात बुढ्ढीके बाल घेऊन बसलेलं असतं, तर बायकोच्या कडेवर दुसरं पिल्लू आणि हाताशी फ्रीलचा फ्रॅाक घातलेली मुलगी तुटलेली स्लीपर फरफटत काही तरी घेऊन देण्याचा हट्ट करत, थोडीशी रडत चालत असते.
वेगवेगळ्या पदार्थांच्या गाड्या लागलेल्याच असतात. त्यात खाजा, पेठा, वडापाव, फाफडा इत्यादी पदार्थांवर लोक ताव मारत असतात. या दिवशी बाकी दुकानं बंद असतात. बाजाराच्या गजबजाटात कुठेतरी ऊसाच्या गुऱ्हाळाच्या घुंगरांचा आवाज मात्र सुरूच असतो.
वेताच्या विणलेल्या टोपल्या, कुंचे, लाकडी खलबत्ते, पोळपाट लाटणी, पाटा वरवंटा, प्लास्टिकच्या वस्तू, मच्छरदाण्या, उदबत्या, धूप, पूजेचं सामान, खोटे दागिने या सगळ्यांनी बाजर संध्याकाळ होईपर्यंत अगदी गच्च भरून जातो. आसपासच्या खेड्यांमधून आलेली नवीन जोडपीही इथं खास खरेदी करताना दिसतात.
जेमतेम १८-१९ वर्षांच्या त्या कोवळ्या मुली कशीबशी नेसलेली ती फुलाफुलांची साडी सावरत त्या लाजतच नुकत्या मिसरुड फुटलेल्या त्यांच्या नवऱ्याला एखादा दागिना घेऊन देण्याचा हट्ट करतात! गंमत म्हणजे कर्जतमध्ये एखाद्याला स्वस्त गोष्टींवरून किंवा झगमगत्या कपड्यांवरून चिडवायचं असेल तरी ‘काय मग शुक्रवारचा बाजार का?!’ असंदेखील चिडवलं जातं.
बाजारपेठेतल्या इमारतींच्या गच्चीतून बघितल्यावर हा शुक्रवारचा बाजार खूप सुंदर दिसतो. मला आजही मोह होतोच जायचा आणि बरेचदा मी अजूनही जाते. काही जुने विक्रेते आता सुरकुतलेल्या चेहऱ्यांनी त्यांच्या हातगाड्यांवर दिसतात, तर कुठे ठाकरवाडीतली आऊ आता पांढऱ्या केसांनी थरथरत्या हातांनी दारात लावलेल्या पालेभाज्यांच्या जुड्या विकताना दिसते.
बाजारहाट अगदी मनासारखा झाला असं समाधान अनेकांच्या चेहऱ्यावर दिसतं, तर कुठं नवऱ्यानं नवीन मंगळसूत्र घेऊन दिलं या आनंदात त्या नवविवाहित मुली नवऱ्याचा हात धरून जाताना दिसतात. एखादं खेळणं मिळालं नाही म्हणून एखादं पोर रडत अडखळत चालत असतं, तर ‘पुढच्या शुक्रवारी घेऊ हां’ असं त्याची आई त्याला सांगत असते.
...हळूहळू दिवेलागणीची वेळ होते. बाजार उठायला लागतो. दिवसभर निरनिराळ्या हातगाड्यांनी लपलेलं कपालेश्वराचं दार आता मोकळं दिसायला लागतं आणि त्याचं दर्शन घेऊन आजीचा हात धरून मला मीही घरी जाताना दिसते....