India vs Maldives: सुनील छेत्रीच्या पुनरागमनात भारताचा दणदणीत विजय; मालदीवला ३-० फरकाने हरवले
esakal March 20, 2025 04:45 PM

IND vs MAL: भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनात भारताने मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत मालदीवला ३-० फरकाने सहज पराभूत केले. स्पॅनिश प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालीही राष्ट्रीय संघाचा पहिलाच विजय ठरला. छेत्रीने कारकार्दीतील ९५वा गोलही नोंदविला.

भारताच्या विजयात राहुल भेके याने ३४व्या मिनिटास, तर लिस्टन कुलासो याने ६६व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. छेत्रीने ७६व्या मिनिटास भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.

गेल्या वर्षी जूनमध्ये ४० वर्षीय छेत्रीने निवृत्ती पत्करल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ पाच लढती, तर मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली चार सामने विजयाविना होता. अखेर बुधवारी संघाने आंतरराष्ट्रीय विजयाची चव चाखली.

मेघालयाच्या राजधानीत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यजमान संघाने गोलशून्य बरोबरीची कोंडी अर्ध्या तासाच्या खेळानंतर फोडली. ब्रँडन फर्नांडिसच्या शानदार कॉर्नर फटक्यावर राहुल भेके याने उंच उडी घेत अचूक हेडिंग साधले.

मध्यफळीत लक्षवेधक ठरलेल्या ब्रँडन याला ४१व्या मिनिटास दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा फारुख चौधरीने घेतली. कर्णधार सुनील छेत्री व लिस्टन कुलासो यांनी वारंवार आक्रमणे रचत मालदीवच्या बचावफळीला दबावाखाली ठेवले.

तासाभराच्या खेळानंतर लिस्टन कुलासोचा शानदार प्रयत्न मालदीवच्या गोलरक्षकाने पायाच्या साह्याने ऐनवेळी उधळून लावला, मात्र लगेच नाओरेम महेश सिंग याच्या अप्रतिम कॉर्नर फटक्यावर लिस्टनचे हेडिंग भेदक ठरले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.