आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे आणि अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक दीड महिन्याआधीच जाहीर झालं होतं. मात्र या स्पर्धेतील 6 एप्रिलला होणाऱ्या सामन्यांवर संकट होतं. त्यामुळे बीसीसीआयने वेळीच पावलं उचलून वेळापत्रक बदललं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्यावर सावट होतं. रामनवमीच्या दिवशी हा सामना होणार असल्याने प्रशासनाने हात वर केले होते. पुरेशी सुरक्षा पुरवू शकत नाही असं सांगितलं होतं. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने कोलकाता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनेनंतर ही माहिती दिली होती. बीसीसीआयचं या सूचनेमुळे टेन्शन वाढलं होतं. वेळापत्रक नियोजित असल्याने सामन्याची वेळ बदलणं खूपच कठीण होतं. पण बीसीसीआयने यावर वेळीच तोडगा काढला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना 6 एप्रिलला कोलकात्याच्या ईडन गार्डनर मैदानात होणार होता. पण आता हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव शिफ्ट केला आहे. आता हा सामना कोलकात्याऐवजी गुवाहाटीला होणार आहे. 6 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात याच दिवशी होणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये संध्या 7.30 वाजता सुरु होईल. या पर्वातील वेळापत्रकानुसार 12 दिवस डबल हेडर सामने असणार आहेत.
आयपीएल 2025 स्पर्धेत एकूण 10 संघ असून 65 दिवसात 74 सामने होणार आहेत. भारतातील 13 ठिकाणी हे सामने होणार आहेत. यापैकी 62 सामने हे संध्याकाळी असणार आहेत. तर 12 सामने दुपारी होणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 22 मार्चला होणार आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात हा सामना होणार आहे.