-उन्हाळी सुट्टीसाठी उधना-मंगळूर विशेष गाडी
esakal March 21, 2025 08:45 PM

उन्हाळी सुटीसाठी उधना-मंगळूर गाडी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : उन्हाळी सुटी हंगामात नियमित गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक विशेष धावणार आहे. वसईमार्गे २९ जूनपर्यंत विशेष गाडी धावणार असल्याने पर्यटकांसह चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम उपनगरातून धावणाऱ्या उधना-मंगळूर स्पेशलमुळे बोरिवली, वसई, विरार, भाईंदर, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. शिमगोत्सवात २ मार्चपासून चालवण्यात आलेल्या विशेष फेऱ्यांना चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक विशेष उन्हाळी सुटी हंगामासाठी चालवण्यात येणार आहे.
आठवड्यातून बुधवार व रविवारी धावणारी स्पेशल उधना येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात मंगळूर येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी उधना येथे पोहचेल. या विशेष गाडीमुळे उन्हाळी सुटी हंगामात रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.