डॉ. आंबेडकर यांचा वारसा पुढे
नेण्यासाठी सजग राहूया ः डॉ. वाघ
खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजालाच नाही तर समग्र बहुजन समाजाला आत्मभान दिले. आजचा दिवस हा ऐतिहासिक असून महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून डॉ. बाबासाहेबांनी मनुष्याच्या स्पर्शाने पाणी बाटत नाही हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हा सत्याग्रह होऊ नये म्हणून आडकाठी करणाऱ्या सर्व व्यवस्थेला त्यांनी आपल्या कार्याच्या रुपाने चोख प्रतिउत्तर दिले. त्यांच्या या मानवतावादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सजग होऊया, असे आवाहन मुंबई विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आणि आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष डॉ. संदेश वाघ यांनी केले.
पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महाविद्यालयातर्फे आयोजित शिक्षण, संस्कृती, इतिहास, साहित्य, कायदा आणि समाज यावर एकविसाव्या शतकातील संशोधनाचा दृष्टिकोन या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे, सरचिटणीस नरेश पाचलकर, संस्था सदस्य विजय सावंत, चंद्रकांत लिंगायत आदी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनचे विजय सावंत यांना महात्मा फुले समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार, डॉ. कुसुमेंद्र सोनटक्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रख्यात संशोधक राष्ट्रीय पुरस्कार, डॉ. पंडित भोयर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक राष्ट्रीय पुरस्कार, सहाय्यक प्राध्यापक सरला पानतावणे यांना सावित्रीबाई फुले संशोधक राष्ट्रीय पुरस्कार, डॉ. सुजाता गौरखेडे, डॉ. सचिन बनसोड, डॉ. अरुणा वाघोले, ॲड. अरुण राऊराले आदींना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. अमेरिकेहून डॉ. लक्ष्मण सत्या यांनी परिषदेला संबोधित केले.