आईमुळेच अभिनयाला बळ
esakal March 22, 2025 11:45 AM

वल्लरी विराज - अभिनेत्री

माझी आई का महत्त्वाची आहे, हे मी शब्दांत नाही सांगू शकत. आई सगळ्याच गोष्टींसाठी महत्त्वाची आहे. तिच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि मी वेगळी राहत असली, तरी प्रत्येक लहानसहान गोष्टीमध्ये मला ती लागते. आई माझी प्रत्येक गोष्ट पद्धतशीर करते. आम्हाला कुठं जायचं असेल, तर ती व्यवस्थित नियोजन करते. आमची वेळ पाहून आम्हाला तयार करते.

मी साडेतीन-चार वर्षांची असताना रेडिओवरती गाणं लागलं, की नृत्य करत असे. तेव्हा आईला वाटलं, की मला नृत्य आवडेल, त्यासाठी नृत्य प्रशिक्षण द्यायला पाहिजे. म्हणून तिनं मला कथक नृत्याचा क्लास लावला आणि ती मला क्लासला सोडायला आणि घ्यायला यायची. आईमुळेच माझ्यात नृत्याची गोडी लागत गेली. हळूहळू मी त्यात रुची निर्माण केली. त्यामुळेच आज कथ्थक नृत्य हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. हा छंद मी फक्त आणि फक्त आईमुळेच जोपासू शकले. कारण आईनं मला डान्स क्लासला घातलं, नसतं, तर बहुतेक मला हे जमलं नसतं. त्यामुळे माझ्या नृत्याच्या छंदाचं सर्व श्रेय आईलाच आहे.

माझ्या आईमध्ये असलेली शिस्तबद्धता माझ्यात यायला पाहिजे. आईची नियोजनाची पद्धत किंवा निःस्वार्थीपणे प्रेम करण्याची वृत्ती हे गुण माझ्यात यावेत, असं मला नेहमीच वाटतं. आता मी लीलाची जी भूमिका साकारत आहे, यात मी नि:स्वार्थपणे प्रेम करत आहे. हे गुण मी माझ्या आईकडून शिकले. भूमिका साकारताना मी माझ्या आईला आठवते, अन् त्यानुसार भूमिका साकारते.

आईबद्दलचा अविस्मरणीय प्रसंग माझ्या लक्षात आहे. तिचं ऑपरेशन झालं होतं, तेव्हा मी शाळेमध्ये होते. तिला खूप त्रास व्हायचा. कॅन्टीनला खायला लागू नये म्हणून ती उठून माझ्यासाठी डबा करायची. एवढी आजारी असतानाही तिनं माझा विचार केला आणि आताही करत आहे. असे अनेक प्रसंग आहेत.

आईमुळे मला एक सवय लागली. माझी आई शिस्तप्रिय आहे, तिला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी कराव्या लागतात आणि काही ठरवलेल्या गोष्टी ती तशाच पद्धतीनं करते. तिच्यामुळेच मी आता तेरा-चौदा तास चित्रीकरण करूनही सकाळी लवकर उठून व्यायाम करते. माझ्या जेवणाचा डबा मी स्वतः बनवते. मी वेळेवर खाते की नाही, वेळेवर व्यायाम करते की नाही, याच्याकडे तिचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे माझ्या आहाराचं, व्यायामाचं अन् दैनंदिन जीवन चांगल जाण्याचं श्रेय माझ्या आईला जातं.

विविध मालिका व चित्रपटासाठी ऑडिशन देताना अनेकदा आपली निवड होत नाही, असाच अनुभव मलाही आला होता. त्यामुळे मी थोडीफार नाराज होत असे; पण आई कायम माझ्याबरोबर असायची आणि मला सांगायची, की ठीक आहे ही ऑडिशन नाही, पुढची ऑडिशन दे. त्यावेळेस आई आणि बाबा दोघेही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी कुठे कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यावर अनेक चाहते माझ्यासोबत फोटो काढतात. त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला होतो आणि आईच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून मलाही खूप आनंद होतो.

मी कॉलेजमध्ये असताना नाटकाची तालीम पहाटे दोन वाजेपर्यंत करायचे. त्यामुळे घरी पोचेपर्यंत आई जागी राहायची. कधी-कधी तर ती मला दोन वाजता कॉलेजला घ्यायला यायची. ती कायम म्हणायची, की ‘‘तुला जे आवडतं ते करण्यासाठी तू खूप कष्ट घेत आहेस. त्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेस. हे सर्व तू मनापासून करत आहेस, याची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही दोघे तुला पाठिंबा देत आहोत.’’

माझी आई माझी खूप जवळची मैत्रीणसुद्धा आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिला माहीत आहे. मी अगदी छोटी गोष्टसुद्धा तिला सांगते. सध्या मी झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अभिनय करत आहे. मात्र, चित्रीकरणामुळे आम्हा दोघींना एकमेकींशी बोलण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. मग मी घरी आल्यावर कॉफी पिता-पिता आम्ही खूप गप्पा मारतो. आई मला सतत म्हणते, की तू स्वतः सगळं करू शकतेस, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतेस आणि तुझा निर्णय बरोबर असो अथवा चुकीचा असो, मी कायम तुझ्या पाठीशी उभी असीन. आईच्या या विश्वासामुळेच मी स्वतंत्रपणे विचार करू लागले, निर्णय घेऊ लागले. कारण, मला खात्री आहे की, आपल्या आयुष्यात काहीही झालं तरी आई आपल्यासोबत आहे. हाच विश्वास मला आयुष्यात एक- एक पाऊल पुढे टाकण्यासाठी उपयोगी पडत आहे.

(शब्दांकन : तन्वी गुरव)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.