मालकी हक्काची खोली
esakal March 22, 2025 11:45 AM

डॉ. राजश्री पाटील - प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ

घर हा जर ललितनिबंध असेल तर मास्टर बेडरूम ही कविता आहे. सहजीवनाच्या विविध वळणांना पाहिलेली नादमय कविता. रम्य संध्याकाळ, घरातल्या पिल्लांच्या किलबिलाटाने उजाडलेला दिवस, सुखाचे क्षण, काळजीची काजळी, चढ-उतार काय काय पाहिलेलं असतं या खोलीनं. त्या त्या कुटुंबाचं वारसाहक्कानं प्राप्त झालेलं संचित, मोलाचा ऐवज, महत्त्वाची कागदपत्रं ते झबली टोपडी असं सगळं सगळं सामावून घेणारी ही खोली विशेष सुंदर असावी.

ही विशेष खोली सजवताना उभ्या भारतातील माणसांनी बंगाली मास्टर बेडरूम डोळ्यांसमोर ठेवावी इतकी ही रचना श्रेष्ठ असावी. फोर पोस्टर बेड तयार करून घेता येईल किंवा आयता विकतही मिळतो. हे पलंग विसाव्याचं ठिकाण असतात. दिसायला देखणे असतात. याला कोरीवकाम केलेले चार खांब असतात आणि वर एक लाकडी फ्रेम असते. ही फ्रेम मलमलच्या पडद्यांना अंगाखांद्यावर खेळवत असते. फोटोतील मलमलच्या झुळझुळीत पडद्यांवर बोगनवेलीच्या फांद्या चितारल्या आहेत. बोगनवेलीचं फूल (पानच खरं तर) पाहून मस्तानीच्या सौंदर्याची आठवण व्हावी असं! कागदासारख्या पातळ, पारदर्शक फुलांवर उठून दिसणाऱ्या शिरा चित्रकर्तीनं दाखवल्या आहेत. फांदीचं झुकणंही मोहक आहे. हे पडदे वेळोवेळी धुवून स्वच्छ करता यावेत यासाठी, मागच्या बाजूला काजं- बटणं केलेली आहेत.

त्या गुंड्या रंगीबेरंगी आहेत. लाकडाची नाजूक फुलंच! या पलंगावर पांढरी चादर शोभून दिसते. कोणत्याही फिकट रंगाचीही छान दिसते. यावर पांढरे उभ्रे घातलेले लोड, विविध आकारांच्या उशा ठेवणं हा कलात्मकतेचा उत्तम नमुना असतो. या पलंगाच्या खालच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याचं सौंदर्य अबाधित ठेवणं आवश्यक आहे. परंतु चादरी ठेवण्यासाठी जागा हवी होती. अशा वेळी चारचाकी खण करण्याची शक्कल लढवावी. हेतू साध्य झाला आणि पलंगाचा दर्शनी भागही जसाच्या तसा राहिला. फोर पोस्टर बेडसमोर सोफ्यासारखी लांबट खुर्ची किंवा ट्रंक ठेवावी. लांबट खुर्ची असेल, तर सोफा थ्रो टाकण्याइतपत सजावट करता येते; पण ट्रंक ठेवली तर मात्र चैन. त्यावर एक-दोन पुस्तकं, डायरी, सुगंधी मेणबत्ती ठेवता येते. हे सर्व साहित्य आणि मलमलचे पडदे यांनी केलेली वातावरणनिर्मिती उन्हाळासुद्धा शीतल करते.

हल्ली घरांच्या खिडक्या लांब रूंद असतात. या अवकाशाचा फार चांगला उपयोग करता येतो. बेडची एक बाजू आणि खिडकीच्या मधल्या भागात लहानसं कॉफी टेबल आणि आकारानं लहान अशा दोन खुर्च्या ठेवाव्यात. या कॉफी टेबलवर (लाकडावर) हाती चित्र काढलेलं असावं. दोन कप आणि एखादं वाडगं बसेल इतपत त्याचा आकार असला तरी चालेल. खिडकीशेजारी दीड-दोन फुटांची भिंत असेल, तर तीवर खुशाल आरसा लावावा. या आरशाचं लहानसं (सहा-आठ इंच खोलीचं) कपाटच करावं.

या खोलीतील कपाटात साड्या, कोट, टाय मोजे व्यवस्थित राहतील अशी रचना करावी. या कपाटाच्या मुठी कलात्मक अशा पितळी किंवा कास्ट आयर्नच्या असाव्यात. दरवाजावर कोरीव नक्षीकाम करता येईल किंवा हल्ली विविध प्रकारचं कापड, बांबूच्या विणलेल्या शीटस मिळतात त्याही लावता येतील. या कपाटाजवळच पलंगाशेजारचे ओपन शेल्व्हज, साईड टेबल यावं. यावर फुलदाणी असावी. त्यात नेहमी ताजी फुलं ठेवलेली असावीत. साईड टेबलच्या वरच्या भिंतीवर पारंपरिक भारतीय चित्रं असावीत किंवा कुटुंबाचं पोट्रेट, स्केचेस असावीत. या खोलीचं छत हे नेहमीच्या पीओपीपेक्षा वेगळं असावं. त्यासाठी कापड, लाकूड, काच यांचा उत्तम उपयोग करता येतो.

थोडक्यात काय, तर चित्तवृत्ती प्रसन्न करणाऱ्या आणि गरजेच्या वस्तू या खोलीत असाव्यात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.