राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
भाजी बाजारात, मंडईत सहज फेरफटका मारला तर तीन प्रकारचे पालक हमखास दिसतात. या भाजीवाल्याकडून, त्या भाजीवाल्याकडे मुलांना फरपटत घेऊन जाणारे ‘बलशाली’ पालक.
दुसरे, मुलाने काही प्रश्न विचारले किंवा ‘हे घेऊया.. ते घेऊया..’ असे म्हंटले तर त्याच्यावर वसकन् खेंकसणारे ‘खेकसू’ पालक.
आता आपल्या तावडीत मुलगा आलाच आहे, तर अजिबात वेळ न दवडता मुलावर ‘उपदेशाची फवारणी’ करणारे ‘उपदेशी’ पालक, हा तिसरा प्रकार.
अशा पालकांच्या वेढ्यात अडकलेल्या मुलांबाबत मला अपार सहानुभूती वाटते. कारण असे पालक घरी येतात तेव्हा त्यांच्या पिशवीतली भाजी ताजी आणि सोबतची मुले मात्र मरगळलेली असतात.
आता भाजी आणायला जाताना मुलाला सोबत घेऊन जाण्याअगोदर काही गोष्टी समजून घ्या. भाजी घ्यायला जाताना कोणत्या दोन किंवा तीन पिशव्या घ्यायच्या, आणि का घ्यायच्या हे मुलाला समजावून सांगा. एकच पिशवी घेतली तर काय आणि कसे व्यवस्थापन करावे लागेल हेही सांगा. उदा. टोमॅटो आधी पिशवीत टाकले. मग त्यावर कांदे, बटाटे आणि नारळ टाकले तर पिशवीतच टोमॅटोचं ऑम्लेट तयार होईल. म्हणून भाजी घेण्याचं व्यवस्थापन करावं लागतं.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण भाजी कशी निवडून घेतो? प्रत्येक भाजी चांगली कशी आहे, हे ठरवण्याचे निकष वेगवेगळे असतात. त्याबाबत मुलांना सविस्तर माहिती द्या. उदा. पालेभाजी, फळभाजी, फुलभाजी आणि कंद याचे निकष वेगळे आहेत. बटाटे, सुरण, रताळी आणि कांदे हे जमिनीखाली असतात. हे ताजे घेतले तर ते ओलसर असतात. हे सुकलेले घ्यावे लागतात. ओलसर गोष्टी लवकर शिजत नाहीत. कांदे सुकले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी कांदा हातात घ्यायचा आणि त्यावर अंगठा घासल्यावर त्याची साल जर चटकन निघाली तर कांदा सुका आहे हे समजावं. तसंच पालेभाजी घेताना त्याचा ताजेपणा समजण्यासाठी पालेभाजीची पानं आणि मुळं ही पाहावी लागतात. हे सारं मुलांना दाखवा.
यावेळी मुलं तुम्हाला न समजणारे किंवा तुम्हला पटकन राग येईल असे प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तेव्हा चिडू नका. ‘इतकं पण समजत नाही का?’ असं म्हणून त्याचा अपमानही करू नका. मूल प्रश्न विचारत आहे म्हणजे तो शिकण्यासाठी उत्सुक आहे, हे समजून घ्या. शांतपणे त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल, तर ‘आपण ते शोधूया’ असा विश्वास त्याला द्या. लक्षात ठेवा या विश्वासातूनच तो शिकण्याची एक पायरी पुढे जातो.
भाजी बाजार किंवा मंडई म्हणजे ताज्या-ताज्या गोष्टी फक्त शिकण्याचीच नव्हे, तर अनुभवण्याची ही जागा आहे. चांगल्यात चांगली गोष्ट कशी निवडावी? ती कुठून घ्यावी? कशी घ्यावी? आणि तीच का घ्यावी? हे सारं मुले प्रत्यक्ष अनुभवातून पालकांसोबत इथे शिकत असतात. या शिकण्याला ‘सहज शिक्षण’ असं म्हणतात.
हे सहज शिक्षण मुलाला मिळालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी मुलाला भाजी निवडू देण्याची संधी द्या. फक्त यावेळी मुलावर उपदेशांच्या आणि सूचनांच्या पिचकार्या मारू नका. मुलं भाजी निवडत असताना पालकांनी शांतपणे हातात पिशवी घेऊन उभे राहणे अपेक्षित आहे. तुम्ही ‘असे उभे राहता का?’ इथे तुमची ही परीक्षा आहे. म्हणूनच आधी पालकांना आणि मग मुलांना बेस्ट ऑफ लक! ‘मुलांनी आणलेली भाजी जे घर चवीने खातं ते घर शहाणं असतं’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.