सातारा : ग्रामविकासमंत्री व भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रकरण थांबविण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यातील एक कोटी रुपये रोख स्वीकारताना मंत्री गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत आज सकाळी अटक करण्यात आली. संबंधित महिलेच्या वकिलाच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत काँग्रेसचे नेते विराज रतनसिंह शिंदे (रा. वाई) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दहा मार्चला सायंकाळी चारच्या सुमारास ते मित्रांसोबत सातारा येथील चंद्रविलास हॉटेलमध्ये बसले होते. या वेळी संबंधित महिलेचे वकील ॲड. शाहिद इनामदार त्यांना भेटले.
गोरे यांचे ते चांगले मित्र असल्याने त्यांनी तुषार खरात व संबंधित महिलेकडून होत असलेल्या बदनामीबाबत त्यांनी चर्चा केली, तसेच संबंधित महिला माझी क्लायंट आहे. तिला प्रकरण मिटवायचे आहे. तुम्ही यात मदत कराल का, अशी विचारणा वकिलांनी केली. तेव्हा मंत्री गोरे यांच्याशी बोलून सांगतो, असे श्री. शिंदे यांनी त्यांना सांगितले होते.
त्याच दिवशी रात्री वकिलांनी शिंदे यांना फोन करून संबंधित महिलेने वाद मिटविण्यासाठी तीन कोटी रुपये मागितल्याचे, तसेच पैसे दिल्यावर बदनामी थांबविण्याचे व १७ मार्चला मुंबईत उपोषणाला बसणार नाही, असे सांगितले, तसेच मंत्री गोरे एकदा अपघातातून वाचले आहेत. आता त्यांना जिवंत सोडणार नाही, अशी ती म्हणाल्याचेही वकिलांनी सांगितले.
या संभाषणानंतर १६ मार्चला शिंदे यांनी मंत्री गोरे यांची भेट घेतली. त्यांना वकिलांनी दिलेला निरोप दिला. त्या वेळी मंत्री गोरे यांनी खंडणी मागत असल्याबाबतचा तक्रार अर्ज शिंदे यांच्याकडे दिला व तो पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यास सांगितले. त्याच दिवशी वकिलांनी पुन्हा शिंदे यांना फोन केला.
संबंधित महिला प्रकरण मिटविण्यासाठी चर्चा करण्यासाठी १७ मार्चला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी १७ मार्चला शिंदे यांनी मंत्री गोरे यांचा तक्रार अर्ज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात दिला. निरीक्षक अरुण देवकर यांनी शिंदे यांचा जबाब घेतला. त्यानंतर पंचांसमक्ष शिंदे यांनी संबंधित महिलेची वकिलांच्या कार्यालयात भेट घेतली. तेथे महिलेने पैशाच्या मागणीबाबत चर्चा केली.
१८ मार्चला वकील व शिंदे यांची पुन्हा भेट झाली. या वेळी मंत्री गोरे यांच्याशी बोलून पैसे द्यायचे का नाही याबाबत निर्णय घ्या, असे वकिलांनी सांगितले. तेव्हा शिंदे यांनी संबंधित महिलेची पुन्हा भेट घालून देण्याची विनंती वकिलांना केली. १९ मार्चला भेट घालून देतो, असे वकिलांनी सांगितले.
त्यानुसार १९ तारखेला पुन्हा पंचांसमक्ष संबंधित महिलेची कास रस्त्यावरील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. तेथे महिलेने तीन कोटी रुपये दोन टप्प्यात द्या, असे सांगितले. दोन्ही वेळच्या मागण्या रेकॉर्ड करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे यांनी मुंबई येथे जाऊन मंत्री गोरे यांची भेट घेतली. गोरे यांनी मित्रांकडून एक कोटी रुपये घेऊन शिंदे यांच्याकडे दिले. पैसे मिळल्याबाबतची माहिती शिंदे यांनी वकिलांमार्फत महिलेला दिली. त्यानंतर वकिलांनी आज (२१ मार्च) पैसे घेऊन माझ्या कार्यालयात या, असे शिंदे यांना सांगितले.
त्या नियोजनानुसार शिंदे आज सकाळी आठच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात पैसे घेऊन हजर झाले. तेथे पंचनामा केला. त्यानंतर संबंधित महिला माझ्या कार्यालयात आली असल्याचा फोन वकिलांनी शिंदे यांना केला. त्यानुसार पोलिस पथकाने वकिलांच्या कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला.
त्यानंतर शिंदे वकिलांच्या कार्यालयात गेले. तेथे संबंधित महिला हजर होती. शिंदे यांनी पंचांसमक्ष महिलेला दहा लाख रुपयांचा एक, असे दहा बंडल मोजून दाखवून बॅग महिलेला दिली. त्यानंतर महिलेने कोऱ्या कागदावर एक आकडा लिहून त्याखाली सही करून एक कोटी पोचल्याची पोच दिली. त्या दरम्यान पंचाने पोलिसांना इशारा केला. सापळा लावलेल्या पोलिसांनी महिलेला लगेचच खंडणीच्या पैशांसह ताब्यात घेतले.
खंडणी प्रकरणात दहिवडीतील एकास अटकमंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात अनिल जगन्नाथ सुभेदार (रा. दहिवडी) याला आज अटक करण्यात आली. कटात सहभाग असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. अनिल सुभेदार याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.