Black Magic : पैशांचा पाऊस पाडणारी टोळी गजाआड; नऊ जणांना अटक, २४ पर्यंत पीसीआर, मोताळा तालुक्यातील घटना
esakal March 22, 2025 04:45 PM

मोताळा (जि. बुलडाणा) : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोणा पूजा विधी करणाऱ्या मांत्रिकासह नऊ जणांच्या टोळीला बोराखेडी पोलिसांनी जयपूर शिवारातील शेतातून गुरुवारी (ता. २०) रात्री अकराच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

त्यांच्या ताब्यातून एक कारसह चार लाख ४१ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील जयपूर शिवारातील राजेंद्र राठी यांच्या शेतात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोणा पूजा विधी सुरू असल्याची गोपनीय माहिती बोराखेडी पोलिसांना गुरुवारी (ता. २०) रात्री मिळाली होती.

दरम्यान, ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राजेंद्र कपले, पोहेकाँ नंदकिशोर धांडे, नापोकाँ प्रवीण पडोळ, पोकाँ सुनील भवटे, पंडित, वैभव खरमाळे यांच्या पथकाने सदर शेतातील फार्म हाऊसवर गुरुवारी (ता. २०) रात्री अकराच्या सुमारास धडक दिली.

यावेळी आरोपी मांत्रिक गणेश समाधान मोरे (३२, रा. उज्जैन, मध्यप्रदेश), राजेंद्र विठ्ठलदास राठी (६०, रा. जयपूर ता. मोताळा), अमर रमेश पिंजरकर (४५), मनोज सुधाकर मुधोडकर (५०, दोघे रा. मलकापूर जि. बुलडाणा), दीपक सुधाकर सुपे (४८, रा. बोदवड ह. मु. पुणे), नितीन विठ्ठल गायकवाड (२८), रत्नदीप माधवराव पाटील (४५), रमा नीलेश आखाडे (२५), कोमल रमेश गायकवाड (२७, चौघे रा. पुणे) ही नऊ जणांची टोळी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा विधी करताना सापडली.

घटनास्थळी ठिकाणी पूजा विधीसाठी लागणारे साहित्य मांडलेले होते. कुमारिका मुलीकडून पूजाविधी केल्यास पैशांचा पाऊस पडतो, असे मांत्रिक गणेश मोरे याने सहकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे सदर ठिकाणी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून पूजाविधी सुरू होती. पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

त्यांच्या ताब्यातून एक कार, मोबाईल, जादूटोणा साहित्य असा एकूण चार लाख ४१ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. सर्व नऊ आरोपींना आज (ता. २१) न्यायालयात हजर केले असता, त्यांना सोमवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार करीत आहेत.

अशी मांडली होती पूजाविधी

या टोळीने घटनास्थळी जादूटोणा पूजाविधीसाठी लिंबू, नारळ, पांढऱ्या धातूचे कडे, राळ, उद, हळकुंड, रुद्राक्ष माळ, एक लाल कापड, पांढरे धोतर, काळे बिबे, खारीक, लाल सुपारी, नारळ खोबरे, तेल आदी साहित्य मांडलेले होते. मात्र बोराखेडी पोलिसांनी ऐन पूजाविधी सुरू असताना छापा टाकून त्यांचा डाव उधळून लावला.

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कुमारिकेची अट

पैशांचा पाऊस पाडण्याच्या पूजाविधीसाठी कुमारिका पाहिजे, असे संबंधित मांत्रिकाने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे एका १५ वर्षीय मुलीच्या माध्यमातून या पूजाविधी होती. पूजा सुरू असताना बोराखेडी पोलिसांनी छापा टाकला. त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले जाते. हा कार्यक्रम दोन दिवस चालणार होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.