इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला शनिवारी दणक्यात सुरुवात झाली. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासह बंगळुरूने रजत पाटीदारच्या नेतृत्वात आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली.
दरम्यान, पहिल्याच सामन्यात बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीची क्रेज पाहायला मिळाली. उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खानने स्टेजवर बोलवताच विराटच्या नावाचा बराचवेळ जयघोष सुरू होता. त्यानंतर सामन्यादरम्यानही त्याच्या एका चाहत्याने स्टेडियमची सुरक्षा तोडल्याचे दिसले.
कोलकाताने १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूकडून विराट कोहली आणि पाटीदार फलंदाजी करत असतानाच एका प्रेक्षकाने स्टेडियमची सुरक्षा तोडली आणि मैदानात प्रवेश केला. १३ व्या षटकावेळी ही घटना घडली.
तो प्रेक्षक पळत येत थेट पाया पडला आणि त्यानंतर त्याने थेट विराटला मिठी मारली. त्याच्याआधी नुकतेच विराटने अर्धशतक पूर्ण केले होते. दरम्यान, त्या प्रेक्षकाला नंतर सुरक्षा रक्षकांनी मैदानातून बाहेर नेले. पण त्यामुळे काही क्षण सामना थांबला होता.
दरम्यान, विराटच्याबाबतीत अशी घटना पहिल्यांदाच पाहायला मिळालेली नाही, यापूर्वीही अनेकदा प्रेक्षकांकडून त्याला भेटण्यासाठी मैदानाची सुरक्षा भेदण्यात आली आहे.
दरम्यान, विराटने या सामन्यात त्याचे ५६ वे अर्धशतक झळकावले. त्याने सलामीला फिल सॉल्ट सोबत ९५ धावांची भागीदारीही केली. सॉल्टनेही ५६ धावांची आक्रमक खेळी केली. विराट ५९ धावांवर नाबाद राहिला. त्याला रजत पाटीदारनेही १६ चेंडूत ३४ धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळे बंगळुरूने १७५ धावांचे लक्ष्य १६.२ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.
आयपीएलमध्ये ५० धावा करून सर्वाधिकवेळा नाबाद राहणाऱ्या खेळाडूंमध्ये आता विराटने एमएस धोनीला मागे टाकले आहे. विराट २१ व्यांदा अर्धशतकानंतरही नाबाद राहिला. एमएस धोनी २० वेळा अर्धशतकानंतर नाबाद राहिला आहे. पहिल्या क्रमांकावर एबी डिविलियर्स आणि शिखर धवन आहे. हे दोघेही प्रत्येकी २३ वेळा अर्धशतकानंतरही नाबाद राहिले आहेत.
विराटचा ४०० वा टी२० सामनादरम्यान, विराट कोहलीचा हा ४०० वा टी२० सामना होता. तो रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतरचा ४०० टी२० सामने खेळणारा तिसरा भारतीय आहे.
२२ मार्चपर्यंत रोहितने ४४८ टी२० सामने खेळले आहेत, तर दिनेश कार्तिकने ४१२ टी२० सामने खेळले आहेत. या तिघांपाठोपाठ सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनी आहे. त्याने ३९१ टी२० सामने आत्तापर्यंत खेळले आहेत.