जळगाव- तालुक्यातील कानसवाडा शिवारात किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय माजी उपसरपंच तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठच्या सुमारास घडली. युवराज सोपान कोळी (वय ३५, रा. कानसवाडा, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयितास अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी संतप्त जमावाने काही संशयितांच्या हॉटेलवर हल्ला चढविला. हॉटेलमध्ये तोडफोड करून एक दुचाकी जाळल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भादली गाव व परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
युवराज कोळी आई-वडील, तीन मुले, पत्नी यांच्यासह कानसवाडा येथे शेतीकाम करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला. या वादातून तिघांनी त्यांच्यावर चाकू, चॉपरने सपासप वार केले. क्षणार्धात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि जागीच मरण पावले.
काही शेतकऱ्यांसमोर ही घटना घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या वेळी नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला. मृत तरुण शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत मृताचे वडील सोपान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात भरत भास्कर पाटील, त्याचा मुलगा परेश व दुसरा मुलगा देवेंद्र ऊर्फ देवा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र पाटीलला अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.