रस्त्यावरची 'विद्युल्लता'
esakal March 23, 2025 11:45 AM

अरविंद रेणापूरकर

इंदूर येथील एका वाहनविक्रेत्या व्यावसायिकाची जाहिरात वाचनात आली. ‘कोणतीही पेट्रोल गाडी घेऊन या, इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जा. नवा भारत हा संधी पाहतो, पंप नाही’ अशा स्वरूपाची ती जाहिरात होती. या जाहीरातीवरून देशातील ई-वाहनांचा वाढता कल लक्षात येतो. अशा वैविध्यपूर्ण जाहिराती आपण नेहमीच पाहत आलो आहोत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना असल्याने यात नवनवीन प्रयोग पाहावयास मिळत आहेत. अलीकडच्या काळातील इलेक्ट्रिक वाहनांचा विशेषत: आकर्षक तंत्रज्ञानयुक्त रुबाबदार ई-बाईकची वाढती बाजारपेठ पाहता कंपन्या ग्राहकांना अधिकाधिक सुसज्ज वाहने देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहने प्रामुख्याने बाईक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. शून्य प्रदूषण, शून्य ध्वनिप्रदूषण, नेव्हिगेशन प्रणाली आणि चांगला मायलेज मिळत असेल तर कोणताही ग्राहक इ-बाईक घेण्यास उत्सुक राहील. विशेष म्हणजे नव्या ई-बाईक अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून, त्याचा लूक सामान्य वाहनांशी स्पर्धा करणारा आहे. शिवाय ई-बाईक खरेदीसाठी फारसा खिसा रिकामा करावा लागत नाही. +वाहन कर्ज, सरकारचे प्रोत्साहन, कंपनीची सेवा हे मुद्देदेखील ई-बाईक खरेदीला चालना देत आहेत. सर्वांनाच चांगला मायलेज हवा असतो आणि त्याची पूर्तता ई-बाईकने पूर्ण करता येते. बॅटरीची रेंज चांगली मिळते आणि चार्जिंगसाठीही खूप वेळ जात नाही. सर्वात महत्त्वाचे काही बॅटऱ्यांची निर्मिती आता भारतातच होत आहे. एकुणातच ‘मेक इन इंडिया’ पुरस्कृत बॅटरी उद्योग हा ई-वाहन उद्योगाची भरभराट करत आहे. आजघडीला वाहन कंपन्यांचा ‘टार्गेटेड कस्टमर’ हा तरुणवर्ग आहे. या वयोगटाला साजेशा ठरणाऱ्या ई-वाहनांची माहिती उपयुक्त ठरू शकेल.

ओला रोडस्टर

विविध फीचरयुक्त ओला रोडस्टरची निर्मिती रस्त्यांची स्थिती आणि बजेट याचा ताळमेळ साधत करण्यात आली आहे. ओला रोडस्टरमध्ये १३ किलोवॉट क्षमतेची मोटार आणि ३.५ किलोवॉटची बॅटरी आहे. शिवाय ओला रोडस्टर २.५ किलेावॉट आणि ४.५ किलोवॉट श्रेणीतही उपलब्ध आहे. या बाईकला पूर्ण चार्ज केल्यास तुम्हाला दीडशे किलोमीटरच्या आसपास मायलेज मिळतो. या बाईकचा टॉप व्हेरिएंट ५०० किलोमीटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. शिवाय नव्या व्हर्जनमध्ये वजनही कमी करण्यात आले आहे.

रिवोल्ट आरव्ही-४००

रिवोल्ट बाईकध्ये तीन किलोवॉटची मिड ड्राइव्ह मोटार आणि ३.२४ किलोवॉटची बॅटरी मिळते. चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. ती पूर्ण चार्ज झाल्यास नॉर्मल मोडवर दीडशे किलोमीटरचा मायलेज देते. या बाईकची किंमत सव्वा लाखाच्या आसपास आहे.

ओबेन रॉर

बंगळूर येथील ओबेन इलेक्ट्रिक कंपनीने ३.४ केडब्ल्यूएच आणि ४.४ केडब्ल्यूएच श्रेणीत ओबेन रॉर मोटारसायकल आणली आहे. शिवाय कमी क्षमतेची २.६ केडब्ल्यूएच श्रेणीतही बाईक उपलब्ध आहे. फास्टर चार्जरच्या मदतीने या बाईकचे ८० टक्के चार्जिंग ४५ मिनिटे ते दीड तासांतच होते. मायलेज दीडशे किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहे. बाईकची किंमत साधारणपणे १.२० लाख रुपयांच्या आसपास आहे.

अल्ट्राव्हायोलेट शॉकवेव

१२० किलो वजनाच्या शॉकवेव मोटारसायकलची मोटार १४.७ एचपी ऊर्जा आणि ५०५ एनएमचा टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते ही बाईक केवळ २.९ सेकंदांतच शून्य ते ६० किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठू शकते. त्याचा टॉप स्पीड १२० किलोमीटर प्रतितास आहे. एका चार्जिंगमध्ये ती १६५ किलोमीटरचे अंतर पार करू शकते.

फेराटो डिसरप्टर

मागच्या वर्षी बाजारात आणलेल्या ओपीजी मोबिलिटीची फेराटो डिसरप्टरची सध्या चर्चा आहे. ३.९७ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी ‘मेक इन इंडिया’ असून, ती एकदा चार्ज केल्यानंतर १२९ किलोमीटरचा मायलेज देते. कमाल वेग मर्यादा ९५ किलोमीटर प्रतितास आहे. शक्तिशाली मोटार स्टायलिश डिझाइन आणि तीन ड्रायव्हिंग मोड (इको, सीटी आणि स्पोर्ट्स) हे तरुण वाहनस्वारांना आकर्षित करणारे आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव

आधुनिक इलेक्ट्रिक बाईकमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स अाहेत. मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही फोनवरून बॅटरी स्टेटस, चार्जिंग वेळ, जीपीएस लोकेशन पाहू शकता. दुसरे तंत्रज्ञान रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. ही तंत्रज्ञान प्रणाली ब्रेक लावताना बॅटरीला परत ऊर्जा देते. त्यामुळे गाडीची रेंज वाढते. शिवाय कीलेस एंट्री आणि अँटी-थेफ्ट अलार्म तंत्रज्ञान हे सुरक्षिततेसाठी उपयुक्त असून, हे फीचर्स इलेक्ट्रिक बाईकमध्ये दिसतात.

इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ
  • देशात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची वाढती क्रेझ पाहता यावर्षाच्या अखेरीस दुचाकीच्या श्रेणीत भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास येऊ शकते. दुचाकी वाहन बाजारासंदर्भात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार भारत या वर्षाच्या अखेरीस चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे. संशोधन संस्था ‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या म्हणण्यानुसार, पुढील चार वर्षांत देशात रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ही सध्याच्या तुलनेत २५ टक्क्यांनी अधिक असेल.

  • भारतातील दुचाकी वाहनबाजारात होणाऱ्या बदलाला अनेक घटक कारणीभूत आहेत. आर्थिक विकास, काळानुसार उपयुक्त ठरणारे वाहन आणि कमी अंतराच्या प्रवासासाठी दुचाकी वाहने आणि यातही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल वाढला आहे. देशातील टियर-२ अणि टियर-३ शहर तसेच ग्रामीण भागात मोटारसायकल हे दळणवळणाचे प्रमुख साधन असताना उच्च मायलेज देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी आगामी काळात वाढणार आहे.

  • ‘सोसायटी ऑफ मॅन्यूक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या (एसएमईव्ही) आकडेवारीनुसार २०२३ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची एकूण संख्या ८५७,३६९ युनिट होती आणि ती २०२४ मध्ये ८९१,७३८ युनिटवर पोहोचली. यावरून इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात येते. सध्या बाजारात ओला इलेक्ट्रिकसह टीव्हीएस मोटार कंपनी, बजाज ऑटो, अथर एनर्जी, हीरो वीडा, एम्पियर, बीगोस, ओकाया, रिवोल्ट, कायनॅटिक ग्रीन यासह अनेक कंपन्या दर महिन्याला चांगल्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करीत आहेत.

  • ई-बाईक किंवा वाहन दररोज साधारणपणे पन्नास ते साठ किलोमीटर चालविल्यास बॅटरीपोटी सरासरी दहा ते पंधरा रुपये खर्च येतो. हा खर्च पेट्रोलच्या तुलनेत खूपच नगण्य आहे. शिवाय वाहनाचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर ठेवला तर बॅटरीची कामगिरी सुधारते. ॲक्सिलेटर आणि ब्रेकचा कमीत कमी वापर हा ई-वाहनांना दीर्घकाळ दर्जेदार राहण्यास मदत करणारा आहे. अर्थात ई-वाहनांचे सुटे भाग तुलनेने महाग असतात. त्यामुळे सजगतेने ई-वाहन चालविल्यास खिसा कापला जाणार नाही.

ई-बाईकची काळजी
  • सामान्य वाहनांच्या तुलनेत ई-बाईकच्या देखभालीचा खर्च अधिक नसला तरी प्रसंगी खर्चिक राहू शकतो. ई-बाईक हा नियमित प्रवासाव्यतिरिक्त साहसी पर्यटनाला जाण्यासाठी चांगला पर्याय आहे. ब्रेकिंग सिस्टीम आणि बॅटरीची दक्षता घेतल्यास ई-बाईक दीर्घकाळ सेवा देईल.

  • नियमित तपासणी : ई-बाईक खराब होऊ नये यासाठी अन्य वाहनांप्रमाणेच नियमित तपासणी हवी. रस्त्यावरून जाताना हादऱ्याने ई-बाईकच्या बोल्टची पकड सैल होऊ शकते. वाहनांचे सुटे भाग कोणत्या ना कोणत्या कारणाने तुटू शकतात किंवा सैल हेाऊ शकतात. अशावेळी नियमित तपासणीतून किरकोळ बाबी वेळीच दुरुस्त होऊ शकतात.

  • बॅटरीची दक्षता : बाईकच्या बॅटरीचे आयुष्य चांगले राहण्यासाठी दिशानिर्देशानुसार चार्ज करायला हवी आणि त्यास उच्च तापमानात नेऊ नये. गरजेनुसार बॅटरी वाहनाच्या बाहेर काढून कोरड्या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.

  • टायरची स्थिती : चांगल्या आणि सुरक्षित राइडसाठी टायरमधील हवेचा दाब पुरेसा असणे गरजेचे आहे. मॅन्युफॅक्चरने दिलेल्या निर्देशानुसार हवा भरावी. वाहन सतत सक्रिय ठेवल्यास टायर सुस्थितीत राहते. वाहन बराच काळ एकाच जागी उभे राहिल्यास टायरचे आयुष्य कमी होऊ शकते.

  • सर्व्हिसिंग : सामान्य बाईकप्रमाणेच ई-बाईकची वर्षातून दोनदा सर्व्हिसिंग केली जाते. बेल्ट आणि ब्रेक हे महत्त्वाचे असून, त्यावरच या गाडीचा फोकस आहे. दर पाच हजार किलोमीटरनंतर वाहनाची सर्व्हिसिंग केली जाते. मात्र मुदतीच्या अगोदरच किलोमीटर पूर्ण केले असेल तर सर्व्हिसिंग लवकर करणे हिताचे राहू शकते.

  • विमाकवच : बॅटरी आणि वाहन असा दोन्ही विमा उतरविलेला असतो. अर्थात वाहनाला विमाकवच असणे गरजेचे असून, तो आर्थिक आणि मानसिक आधार देणारा असतो. बॅटरी जर सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक काम करीत नसेल तर कंपनीकडून बॅटरी बदलून दिली जाते.

  • कमी देखभाल खर्च : सामान्य पेट्रोल बाईकमध्ये इंजिन, गिअरबॉक्स, क्लच यासारखे अनेक गुंतागुंतीचे सुटे भाग असतात. त्यामुळे त्याच्या वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज भासते. इलेक्ट्रिक बाईकमध्ये अशी किचकट यंत्रणा नसल्यामुळे देखभालीचा खर्च कमी असतो. बॅटरी आणि मोटरची नियमित तपासणी पुरेशी असते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.