Pune Uber : पुण्यात उबरचा मोठा निर्णय, एक एप्रिलपासून ऑटो मीटरप्रमाणेच दर आकारणार
Saam TV March 24, 2025 06:45 PM

Pune Uber Auto Drivers : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील उबर ऑटो चालकांना एक एप्रिलपासून मीटर प्रमाणेच दर आकारावे लागणार आहेत. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी उबरने आपल्या नियमात बदल करत शेकडो ऑटो चालकासोबत करार केला. त्यामुळे एक एप्रिलपासून पुणे आणि पिंपरची चिंचवड परिसरात उबर ऑटो चालक आता इतर ऑटोसारखे मीटरप्रमाणेच दर आकारतील.

एक एप्रिलपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील उबर रिक्षाचालक मीटर प्रमाणेच दर आकारणार आहेत. कंपनी ॲग्रीगेटर मॉडेलचा वापर न करता SAAS ( SOFTWARE AS A SERVICE) मॉडेलचा वापर केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उबरने रिक्षाचालकांबरोबर १८ फेब्रुवारी रोजी नवीन करार केला आहे, त्याची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

नवीन करारानुसार उबर व रिक्षा चालक यांचा एकमेकांशी असलेला कायदेशीर संबंध बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या करारानुसार कंपनी रिक्षा चालकांकडून कोणतेही कमिशन घेणार नाही, परंतु कंपनीने दिलेले सॉफ्टवेअर वापरण्यासाठी ठराविक नेमून दिलेली फी (सद्य परिस्थितीमध्ये १९ रुपये) दररोज घेईल.

यापुढे रिक्षा चालक व कंपनीमध्ये, मालक नोकर किंवा सर्विस प्रोव्हायडर व ग्राहक असे कोणतेही संबंध तयार होणार नसून कामगार कायदे तसेच ग्राहक कायदे कंपनीला लागू असणार नाही असे सदर एग्रीमेंट मध्ये कंपनीने नमूद केले आहे अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली. नागरिकांच्या जनजागृती साठी रिक्षाचालक यांनी अग्रीमेंट ची प्रत रिक्षात ठेवून नागरिकांना नवीन बदलाबाबत रिक्षाचालक अवगत करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.