ही बाबी, ती पपी, या मनुताई, तो बारकू.... अशी रोजची ओळख असलेले, एकमेकांना हाक मारणारे, सगे-सोयरे जपणारं कोकण किती आपलं-आपलंसं होतं!
माझ्या कोकणप्रेमी आईच्या, आशा गवाणकरांच्या पुण्यातून प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचं नावही ‘ओळखदेख राहू हे’ असं होतं. आम्ही रिक्षा घेतली, तेव्हा त्यावर तेच नाव दिलं. रिक्षेवर असं वेगळं काही लिहिण्याची पद्धत तेव्हा नव्हती. सगळे सगळ्यांना ओळखत असल्यामुळे दापोलीत, तालुक्याच्या ठिकाणी गावरान गोडवा होता. गोडी-गुलाबी दाखवण्यापुरती नव्हती. राजकीय वैरभाव कोकणात सौम्य असायचा!
उंचाड्या झाडांवरचे पक्षीही हाक मारत आहेत असं वाटायचं. टोईपोपट तर टोई टोई टोई करत स्वतःचंच नाव घ्यायचे. टिटवीही कातरवेळी स्वतःच्या नावाचा जप करत जायची. ‘टिटिट् वी टिटिट्वी या स्वरात घाबरण्यासारखं काय आहे? पण ‘मोठ्या आईला’ उगाच हुरहूर लागायची.
पावसाळ्याच्या सुरवातीला ‘फायरफ्लाय’ काजव्यांची झगमगती दिवाळी होऊन जायची. विदेशातून येणारा तुरेवाला कोकीळ म्हणजे ‘चातक’ हमखास ऐकू यायचा. चटकन दिसायचा नाही. शोधावं लागायचं. ‘भाऊ, मी कुठे? असं काही ते असावं. त्याची भावकी कोकणातच राहणाऱ्या ‘हॉक’ काकूशी. ‘पावश्या’ही ऐकू येत नाही. हा क्रेस्टेड ककू आपल्या चुलत भावालाही फॉरेनला घेऊन गेला की काय?
निशाचर पतंगांपैकी वेताळ पतंग पंखांवर डोळे वटारल्यागत नक्षी दाखवायचा. भारीच बुवा! हे पतंग रात्रीच स्थलांतर करत असावेत. ‘इव्हिनिंग ब्राउन’ फुलपाखरू मातीमध्ये मळून खेळून दमून बसलय असं वाटे... कुठे गेली ती पाखरं- लेकरं? दुधाच्या बाटलीत चक्क आमरस भरून बाळाला देणाऱ्या एक ताई आम्हाला ठाऊक होत्या. उन्हाळ्यातही तेव्हा गारवा असायचा.
हिवाळ्यात तर दात कडकड वाजवणारा गारठा पडायचा. बाटलीतून आमरस पिणारं बाळ आधी दगडी डोणीशी खेळून, आंघोळीचं बुडबुड नाटक करून आलेलं असायचं. नंतर गोड गुंगीत ते असं ताणून द्यायचं की त्याच्या आईचं उरलेलं घरकाम पटापट होऊन जायचं. आईला ‘मम्मी’ म्हणण्याची प्रथा नव्हती. आबा, अण्णा, आप्पा, तात्या हे कर्ते कुटुंबप्रमुख तसे वचके असायचे.
एक मुलगी तर फारच मजेदार! ती तिच्या समाजसेविका, कर्तबगार आईला ‘बाबा’ म्हणायची. ‘बाबा आली. बाबा कुंभवे गावातल्या बागेकडे गेलीय. याचा अर्थ पाहुण्यांना कळत नसे. ती बाबा कसं काय? असं वाटायचं. त्या तिच्या ‘बाबा’वर ‘शैलगंगा’ नावाची पुस्तिकाही यथावकाश प्रकाशित झाली. स्थानिक शिक्षकाने संपादन केलं.
या शैलजा मंडलिकांच्या घरीदारी अंगणात कुणी ना कुणी वेगळ्या कुटुंबातलं राहायला असायचं. ‘पीडित’ हा शब्द तेव्हा ठाऊक नव्हता, पण अशा बायांना शैलाताईंचं घरटं आसरा द्यायचं. त्यांची मुलंही ते घर आपलं मानून तिथंच राहायची. तिथून शाळेत जायची. रक्ताचं नातं नसताना, गावाला आपला परिवार मानणारी भली माणसं जुन्या काळात जरा अधिक होती.
दापोलीजवळच्या गव्हे गावाला नर्सरीग्राम म्हणून ओळखलं जातं. गुणवत्ता जपणाऱ्या रोपवाटिका तिथं आहेत. गावातलं अमृते कुटुंब नर्सरी व्यवसाय करताकरता गृहिणींना, स्थानिक मंडळींना रोजगार मिळवून देणारी घरगुती खाद्यपदार्थांची निर्मिती. उत्पादनही करत आलेलं.
त्याच गावात स्वदेशी तंत्रज्ञानाची बैठक देऊन विजय गोळे यांनी अनेक उपयुक्त उत्पादन व्यवसाय म्हणून केली. त्यातूनही रोजगारनिर्मिती झाली. विहिरीवर बसवायच्या जाळीपासून नारळ सोलायच्या यंत्रापर्यंत सगळ्या वस्तू तिथं मिळायच्या. मोठ्या, नव्या दुनियेत चंदन उगाळणारी अशी माणसं नव्या पिढीला ठाऊक नसतात, पण कुणी तरी त्यांची धावती नोंद करायलाच हवी!
स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातलं अमर नाव अण्णासाहेब कर्वे यांचं! त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतर त्यांचा मोठा सत्कारसोहळा झाल्याची आठवण आमच्या शिक्षिका, दाबकेबाई सांगायच्या. त्या प्रसंगी ‘महर्षी नावाची संगीतिकाही सादर झाली. स्क्रिप्ट माझ्या आईचं होतं.
अण्णासाहेबांनी त्या लिखाणाचं कौतुक केलं. आता मला ‘ऑपेरा’ हा प्रकार दिसतच नाही. शालेय रंगभूमीवरून नृत्यनाट्य गायब झाली! ‘जिगरमा बडी आग हैं’ वर प्राथमिक शाळेतली मुलगी जर नाचणार असेल, तर कठीण आहे!
मराठी माध्यम, मराठी शाळा याबद्दलचा खूप तुच्छतावाद आता कोकणातही वाढू लागलाय. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, कोकण कायम ‘मुंबईचा गॉगल’ लावत राहिलं. राजधानी मुंबापुरीच्या छायेत राहिलं. मुंबई नवी बनून कोकणाकडे सरकली हे तर मी नेहमीच सांगतो.
माझ्या लहानपणी मुंबईचं उपनगर कोकणासारखं झाडामाडांच्या सावलीत आणि गारव्यात गपगार होतं. आता उलटं झालंय. कोकणाची मुंबई होतेय! मनातलं चंदनही चोरीला जातंय! मग भविष्यात उगाळणार काय? कोळसा?
पक्के मुंबईकर बनून गेलेलं कोकणातले नामवंत साहित्यिक शहरातून जे लेखन करतात, त्याबद्दलही कोकणात राहणाऱ्यांना अभिमानच आहे! कोकण मराठी साहित्य परिषदेचं रिंगण मुंबईत असलं, तरी अंगण कोकणातच आहे! साहित्यात काही वेगळी कृष्णकमळं फुलवणारे सुमेध रिसबूड त्यांच्या लेखनाच्या सुरवातीच्या काळापासून आम्हा वाचनप्रेमींच्या दृष्टीने लक्षवेधी ठरले!
ते जरी मुंबईतल्या पुण्यात पूर्व दिशेच्या विलेपार्ल्यात राहिले, तरी त्यांच्या खेड तालुक्याला - कोकणाच्या रत्नभूमीला विसरू शकत नाहीत. कोकणातल्या दापोलीच्या आसपासच्या गावातले काही बदल निसर्गपूरक संरक्षक ठरले. साप दिसला की, ठेचून टाक असं पूर्वी होतंच.
मात्र, गेल्या दोन दशकात दापोली तालुक्यातही सर्पमित्रांनी केलेली कामगिरी, म्हणजे अनेक विषारी सर्पांनाही दिलेलं जीवदान महत्त्वाचं आहे. सुरेश खानविलकर, किरण करमकरांसारखी ‘सर्पमित्र’ मंडळी आम्हा निसर्गप्रेमींना कायम कौतुकास्पद वाटतात.
‘झाडांचा वाढदिवस’ नावाचा उपक्रम राबवणारे झाडांच्या ‘बर्थडे’ला ग्रामस्थांना बोलावणारे पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे प्लास्टिकच्या वापरालाही गेली अनेक वर्षे जोरदार विरोध करत आहेत. ‘झाडांच्या वाढदिवसा’ला ग्रामस्थ ‘गिफ्ट’ म्हणून खताच्या पेट्या भेटी आणायचे, तेव्हा ‘ऑफबीट वार्ताहर’ म्हणून मलाही गंमत वाटायची. मात्र, ही केवळ मज्जा नव्हे. त्यातून निसर्गभक्तीची रुजवण होते!
काही व्यक्ती ज्या स्वतः हळुहळू ‘संस्था’ बनल्या. आता हयात नाहीत. ज्यांच्या गावात सातवीनंतरच्या माध्यमिक शाळेची सोय नाही, त्या लेकरांना वसतिगृह आणि शाळा उपलब्ध करून देणारी ‘सागरपुत्र विद्या विकास’ संस्था दाभोळच्या इतिहासप्रेमी अण्णा शिरगावकरांनी विकसित केली. त्यांनी आपलं सर्वस्व संस्थेसाठी पूर्ण वेळ दिलं.
अगदी मंडणगड तालुक्यात आशाताई कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या भगिनींनी चालवलेली रत्नागिरी जिल्ह्यातली एकमेव अंधशाळा ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकासाठी ‘कव्हर’ करायला मी गेलो, तेव्हा त्या अंध मुलांचा डोळसपणा पाहून, कलाविष्कार अनुभवून आनंदचकित झालो! नकळत त्यांच्यातला एक होऊन त्यांना बालगीतं गाऊन दाखविली, शिकवली. मलाच एक नवी ‘दृष्टी’ मिळाली!
कोकणात सुंदर सृष्टी आहेच, पण दृष्टी असलेली खास माणसं आणि त्यांच्या सत्कार्याचा दरवळही आहेच की! त्याची ही झलक! आढावा नव्हे! कारण अशी ‘चंदनाची झाडं’ खूप आहेत!