सोलापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाने बँकेत खाते उघडून एन. आर. काबरा अँड कंपनीच्या शुल्कापोटी आलेले १३ लाख ४७ हजार ३३३ रुपये आपल्या खात्यात जमा करुन घेतले. तसेच कंपनीच्या खातेदारांच्या आयकर, जीएसटीची रक्कम न भरता आणि कंपनीच्या खातेदारांच्या आयकर परताव्याचे ४४ लाख ६३ हजार ७०९ रुपये स्वतःसह मित्रांच्या खात्यावर वळविले. अशाप्रकारे एकूण ५८ लाख ११ हजार ४२ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण भीमाशंकर कोनाळे (रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीचे प्रमुख, सनदी लेखापाल नंदकिशोर रामनिवासजी काबरा (वय ६२, रा. बुधवार पेठ, श्रावीका शाळेजवळ, सोना हिरा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
सनदी लेखापाल काबरा यांचे एन. आर. काबरा अँड कंपनी या नावे फर्म आहे. त्याच्या नावाचे बनावट कागदपत्र, शॉपॲक्ट लायसन्स तयार करुन, कार्यालयातील शिक्के व लेटरपॅडचा वापर करुन कोनाळे याने आपण मालक असल्याचे दर्शवून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कर्नाटक बँकेत १७ जुलै २०२१ रोजी स्वतःच्या नावे चालु खाते खोलले. कामाचे शुल्क म्हणून काबरा यांच्या कंपनीच्या नावे आलेले १३ लाख ४७ हजार ३३३ रुपयांचे धनादेश कर्नाटक बँकेतील स्वतःच्या खात्यावर जमा केले.
तसेच १५ मार्च २०२३ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत कंपनीच्या खातेदारांनी आयकर, जीएसटी भरण्यासाठी कोनाळे याच्याकडे रक्कम दिली. त्याने ती रक्कम न भरता त्यांना चलन भरणा केलेल्या बनावट पावत्या दिल्या. ती रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरली. खाते रकमांच्या ठिकाणी परस्पर खाते क्रमांक बदलून तेथे स्वतःसह शशिकांत मसळे, रविकांत मसळे व आनंद मसळे या मित्रांचे खाते क्रमांक जोडले. खातेदारांचा आयकर परताव्यापोटी आलेले ४४ लाख ६३ हजार ७०९ रुपये स्वतःसह मित्रांच्या खात्यावर वळवून घेतले. अशाप्रकारे एकूण ५८ लाख ११ हजार ४२ रुपयांची फसवणूक केली.
गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्गया गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ५० लाखांपेक्षा अधिक असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.