..म्हणून KKR टीम सुरुवातीला सतत हरायची?; जुही चावलाच्या मते ‘ही’ गोष्ट ठरली ‘बॅड लक’
GH News March 23, 2025 04:10 PM

अभिनेत्री जुही चावला आणि शाहरुख खान यांनी त्यांच्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’ (KKR) या टीमसोबत 2008 मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पहिल्या हंगामातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सुरुवातीचे काही हंगाम त्यांच्या टीमसाठी खूप कठीण होते. कारण त्यांना अनेक पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. आयपीएलमध्ये त्यांच्या टीमला विजयासाठी सतत संघर्ष करावा लागल्याने दोन सिझन्सनंतर जुहीला वाटू लागलं होतं की त्यांच्या टीमची काळ्या रंगाची जर्सीच त्यांच्यासाठी ‘बॅड लक’ म्हणजेच दुर्दैवी होती.

‘लिव्हिंग विथ केकेआर’ या डॉक्युमेंट्रीमध्ये जुहीचा पती आणि संघाचे सहमालक जय मेहता यांनी सांगितलं, “अनेक सामन्यांमध्ये सतत टीमचा पराभव होऊ लागल्यानंर जुहीला असं वाटू लागलं होतं की त्यांची काळी जर्सीच बदलली पाहिजे. आम्ही दक्षिण आफ्रिकेतील पराभवाच्या मालिकेनंतर परत आलो तेव्हा जुही अचानक मला म्हणाली की, मी काळ्या रंगाबद्दल अंधश्रद्धा बाळगणारी आहे आणि मला वाटतं की काळा रंग हा केकेआरसाठी अशुभ आहे. तेव्हा शाहरुख आणि माझी पहिली प्रतिक्रिया हीच होती की, हा काय मूर्खपणा आहे.”

या डॉक्युमेंट्रीत पुढे जुही म्हणाली, “मला जर्सीच्या काळ्या रंगाबद्दल नकारात्मक भावना जाणवत होती. मला वाटतं होतं की हा रंग संघाच्या ऊर्जेत सकारात्मक योगदान देत नाहीये. जेव्हा परिस्थिती खूपच वाईट होत गेली, तेव्हा मी खरोखरच त्यावर आणखी ठाम झाले. मी आग्रहाने बोलले की, नाही, आपल्याला हा रंग बदलावा लागेल. काळा हा रंगच नको.” त्या सिझननंतर केकेआर टीमने त्यांच्या जर्सीचा रंग काळ्याऐवजी जांभळ्या रंगात बदलला होता.

याआधी गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जुही म्हणाली होती की सुरुवातीपासूनच ती जर्सीच्या काळ्या रंगाबद्दल खुश नव्हती. “आम्हाला क्रिकेट फ्रँचाइजी चालवण्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि मला आठवतंय की मी शाहरुखच्या घरी मिटींगसाठी जायचे. जिंगल तयार करण्यापासून ते जर्सीचा विचार करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी त्याच्या घरीच ठरवलं होतं. त्याने जर्सीचा रंग काळा आणि सोनेरी असा ठरवला होता. शाहरुख आणि मी त्यावर खुश नव्हतो. मी विचार केला की काळा आणि सोनेरीचं काय कॉम्बिनेशन आहे. कारण काळा रंग अशुभ मानला जातो. पण त्यांनी माझ्यापेक्षा जास्त काम केलंय, म्हणून मी गप्प बसले”, असं जुहीने सांगितलं होतं.

आता आयपीएलच्या अठराव्या सिझनसाठी केकेआरने त्यांची ‘विंटेज जर्सी’ परत आणली आहे. त्यांनी काळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सीसह केकेआरच्या चाहत्यांसाठी ‘रेट्रो किट’ लाँच केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.