परीक्षा २५ एप्रिलला संपली, तरी निकाल १ मे रोजीच! शिक्षकांना ३ मेपासून उन्हाळा सुटी; इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 'सीबीएसई'ची पुस्तके
esakal March 25, 2025 03:45 PM

सोलापूर : शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यंदाची अंतिम सत्र परीक्षा ५ ते २५ एप्रिल या काळात घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार मुख्याध्यापक संघांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षांचे नियोजन केले असून विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षीप्रमाणे १ मे रोजीच जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरवर्षी १ मे रोजी विद्यार्थ्यांचा (इयत्ता पहिली ते नववी) निकाल जाहीर झाल्यावर २ मेपासून शाळांना उन्हाळा सुट्या लागतात. पण, यंदा रमझान ईदनिमित्त दिलेली ३० तारखेची सुटी ३१ मार्च रोजी घ्यावी लागणार असल्याने शाळांची उन्हाळा सुटी एक दिवसाने लांबणार असून ३ मेपासून शाळांना सुटी लागणार आहे. तत्पूर्वी, मुख्याध्यापक संघाच्या नियोजनाखाली विद्यार्थ्यांचे निकाल १ मे रोजीच जाहीर होतील, असे संघाचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्ष नेमके कधीपासून सुरू होणार, यासंदर्भात मतमतांतरे व विविध चर्चा सुरू होत्या. त्यावर १५ जूनपासूनच आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल, असे ‘एससीईआरटी‘ व बालभारतीने स्पष्ट केल्याने तो संभ्रमही दूर झाला आहे. तत्पूर्वी, मेअखेर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचेही निकाल जाहीर होणार आहेत.

१५ जूनपासून सुरू होईल शैक्षणिक वर्ष

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या का कमी होतेय, याचा विचार करून ठोस उपायांची गरज आहे. आता नवीन बदलानुसार आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचीच, पण ‘सीबीएसई’ पॅटर्ननुसार पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. उर्वरित वर्गासाठी पुढे टप्प्याटप्प्याने तशी पुस्तके दिली जातील. १५ जूनपासून शैक्षणिक वर्षास प्रारंभ होईल.

- राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

‘एससीईआरटी’मुळे थांबली पहिलीची पुस्तक छपाई

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात नवीन पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. राज्य मंडळाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून ‘सीबीएसई’च्या धर्तीवर पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे. पण, सध्या बालभारतीकडून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची छपाई पूर्ण झाली असून दुसरी ते सातवीच्या पुस्तकांची छपाई सुरू आहे. पण, इयत्ता पहिलीचे पुस्तक अजून ‘एससीईआरटी’कडून अंतिम न झाल्याने त्याची छपाई अजून सुरू झाली नसल्याचे ‘बालभारती’कडून सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.