सातारा : फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजूस असलेली पडीक जागा बुद्ध विहारासाठी देण्यात यावी. यासाठी २६ वर्षे लढा सुरू असून या मागणीसाठी फलटण तहसिल कार्यालयासमोर ४३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याची दखल घेतली जात नसल्याने रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
साखरवाडी (ता. फलटण) बुद्ध विहाराच्या जागेसाठी बौद्ध समाजाचे जनआंदोलन सुरु आहे. बुद्ध विहाराला साखरवाडीत उपलब्ध असलेली शासनाची आठ गुंठे जागा द्यावी. बौद्ध समाजावर होणारा अन्याय थांबवा. शासनाच्या विविध योजनांमध्ये धार्मिक स्थळांची जागा मंजूर केल्या जातात. त्याच धर्तीवर बुद्ध विहाराला जागा मंजूर करावी. बुद्ध विहाराबाबत होणार राजकीय हस्तक्षेप थांबवावा.
लवकरात लवकर जागा मंजूर करून बौद्ध समाजाला न्याय द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अशोक गायकवाड म्हणाले, आता अस्तित्वाच्या लढ्याची सुरुवात आहे. कित्येक वर्षे बुद्ध विहारासाठी संघर्ष सुरू आहे. पण आज तो निर्णायक टप्प्यावर पोचला आहे. हा लढा केवळ भौतिक जागेसाठी नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
राजकीय डावपेच आणि श्रेयवादाला न जुमानता आपला हक्क मिळवण्यासाठी आता तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी स्वप्निल गायकवाड, आप्पा तुपे, पूजा बनसोडे, अक्षय साळवे, विजय येवले, संतोष गायकवाड, शिवाजी सर्वागोड, श्रीकांत निकाळजे, एकनाथ रोकडे, उत्तम कांबळे, जॉन जोसेफ, प्रतिक गायकवाड, आदित्य गायकवाड आदी उपस्थित होते.