सुधाकर वाघ ः सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता.२६ ः मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटालगतच्या वाड्यापाड्यांतील शेकडो आदिवासी पोट भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मजुरीसाठी धाव घेतात. पेसाअंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्ती असूनही फक्त शासनाच्या उदासिनतेमुळे रोजगारासाठी ठाणे जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यात जावे लागते.
रोजगार हमीच्या माध्यमातून सरकारी दराप्रमाणे २९७ रुपये अत्यंत तुटपुंजी मंजुरी रक्कम मिळते. त्यामुळे स्थानिक ठिकाणी अदिवासींच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाकडे नागरिक मागणी करताना दिसत आहेत. पण प्रशासन संवेदनशील नसल्याने मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांतून शेकडो आदिवासी दररोज पहाटे मिळेल त्या वाहनाने पुणे जिल्ह्यातील आळेफाटा, ओतूर, मंचर, नारायणगाव येथे कांदे काढणी, बटाटे लागवड, झेंडूची फुले काढणीची कामे करण्यासाठी बागायतदारांकडे जातात. तर काहीजण वीटभट्यांवर स्थलांतरित होतात.
------------------------------------
‘या’गावांमधून स्थलांतर
यात मुरबाड तालुक्यातील मोरोशी, माळ, वाल्हिवरे, भोईरवाडी, भोरांडे, डोंगरवाडी, आवळेवाडी, मोरोशी, मेर्दी, फांगुळगव्हाण, निरगुडपाडा, साखरवाडी, चिंचवाडी, केळेवाडी, कुंभाळा, वाघवाडी, कोंबडपाडा, पायरवाडी, धारखिंड, पेंढरी, (वाघवाडी) केंव्हारवाडी, बांगरवाडी, झाडघर, दिवाणपाडा, आवळेवाडी, शिसेवाडी, करपटवाडी, पेजवाडी, वाकलवाडी, आल्याची वाडी, मोधळवाडी, बांडेशेत येथे मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.
---------------------------------------------------------------
अपुऱ्या झोपेअभावी आरोग्याचे प्रश्न
रोजगार मिळावा म्हणून पहाटे तीन वाजता उठून स्वयंपाक करून मिळेल त्या वाहनाने पुणे जिल्ह्याची वाट धरतात आहे. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री उशिरा घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याने तारांबळ उडते. तसेच लांबचा प्रवास करून रात्री उशिरा घरी परत येत असल्या झोपेअभावी आरोग्याचे विविध प्रश्नही भेडसावत आहेत.
-----------------------------------------------
रोजगार मिळवण्यासाठी आदिवासी बांधवांना पुणे जिल्ह्यात दररोज प्रवास करावा लागतो. शासनाने मुरबाड तालुक्यातच त्यांच्या कायम रोजगाराची संधी उपलब्ध करावी. मजुरीसाठी पहाटे उठून लांबचा प्रवास करून रात्री उशिरा घरी परत येत असल्याने महिला वर्गासमोर विविध अडचणी येतात.
- अरुणा खाकर, माजी उपसभापती पं. स. मुरबाड