अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : मराठी नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. पेण, अलिबाग, महाड, माणगाव, खालापूरसह प्रत्येक तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पूजासाहित्य, रेशमी वस्त्र, झेंडूची फुले, हात-तोरण, साखरगाठी, फुले, मिठाईसह कपड्यांची दुकाने सजली आहेत.
रेडिमेड गुढ्यांनाही यंदा ग्राहकांची पसंती मिळत आहेत. विशेषतः नऊवारी आणि काठ पदराच्या साडीपासून तयार केलेल्या वस्त्रांना ग्राहक अधिक पसंती देत आहेत. त्यांची किंमत १५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. गुढीसोबतच रांगोळी, हळदी-कुंकू, कलश यांचे सेट विक्रीस उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत ३०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.
गुढीपाडव्यानिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी सुरू आहेत. रेडिमेड नऊवारी साडीसह फेटे, पुणेरी पगडी यांना बाजारात मागणी आहे. गुलाबी आणि केशरी रंगाच्या फेट्यांना तरुणाईची पसंती मिळत आहे.
विविध सवलती
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि नवीन वाहन खरेदी करतात. यासाठी मोठमोठे शोरूम्स, मॉलमध्ये आकर्षक ऑफर्स आणि सवलती देण्यात आल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही घडणावळीत सूट देण्यात आली आहे.
साखरेच्या माळा, पूजा साहित्याला मागणी
गुढीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरमाळांना पूजेत मान असतो. पिवळ्या, गुलाबी, केशरी, पांढऱ्या रंगांच्या माळा ५० ते १०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. पूजेसाठी अगरबत्तीपासून ते हळदीकुंकू असे गुढी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बॉक्सलाही पसंती आहे. लहान आकारातील रेडिमेड गुढ्या, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा बॉक्स, गुढी विविध रंगांतील वस्त्रे अशा विविध प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक घरी साखरेच्या माळा खरेदी केल्या जातात. साखर, रंग, दूध व लिंबू यांचा वापर करून माळा तयार केल्या जातात. पूर्वी लहान मुलांना गळ्यात माळा घालायची पद्धत होती; पण आता लहान मुलांना त्याचे आकर्षण वाटत नाही. गुढी उभारताना आंब्याची डहाळी, कडुलिंबाची पानेही लावली जातात. याची छोटी जुडी १० रुपयांना विक्रीस आहे. गुढीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर बांबूच्या काठ्यांना मागणी होती. त्या ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत उपलब्ध होत्या.
............
रामनवमीपर्यंत घराघरांत उभारणार गुढी
पोयनाड (बातमीदार) : प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव हा चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा केला जातो. रामाचे नवरात्र रविवार गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. या सोहळ्यानिमित्त रामनवमीपर्यंत (ता. ६) पोयनाड परिसरात विविध गावांत कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत. कीर्तनकारांकडून रामायण व श्रीराम जन्मकथेचे आख्यान सांगितले जाणार असून पोयनाडजवळील कमळपाडा येथे घराघरांत रामनवमीपर्यंत गुढी उभारली जाणार आहे. रामनवमी सप्ताह पोयनाड, कुर्डूस, कमळपाडा, शहापूर, धामणपाडा, हाशिवरे, काचळी या गावांमध्ये संपन्न होणार आहे.