न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान टीमने टी 20i नंतर एकदिवसीय मालिकेतही पराभवाने सुरुवात केली आहे. पाकिस्तानने यशस्वीरित्या पराभवाची मालिका कायम राखत एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. नॅपियरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने पाकिस्तानला 44.1 ओव्हरमध्ये 271 रन्सवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.
पाकिस्तानच्या टॉप 5 फलंदाजांना शानदार बॅटिंग केली. पाकिस्तानच्या या 5 फलंदाजांच्या खेळीमुळे सामना बरोबरीत होता. मात्र त्यानंतरच्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 5 पैकी दोघांना भोपळाही फोडू दिला नाही. तर तिघे प्रत्येकी 1-1 धाव करुन बाद झाले. पाकिस्तानसाठी बाबर आझम याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बाबरने 83 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 78 रन्स केल्या. सलमान आघा याने 48 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 58 धावा केल्या. तर उस्मान खान 39, अब्दुल्लाह शफीक याने 36 आणि कॅप्टन मोहम्मद रिझवान याने धावांचं योगदान दिलं.
त्यानंतर अवघ्या काही धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या. इरफान खान आणि नसीम शाह या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर तय्यब ताहीर, हरीस रौफ आणि अकिफ जावेद या तिघांनी प्रत्येकी 1-1 धावा केली. तर मोहम्मद अली नॉट आऊट राहिला. न्यूझीलंडसाठी नॅथन स्मिथ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेकब डफी याने दोघांना बाद केलं. तर विलियम ओरुर्के, मायकल ब्रेसवेल आणि मुहम्मद अब्बास या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडसाठी मार्क चॅपमन याने शतकी खेळी केली. तर मुहम्मद अब्बास आणि डॅरेल मिचेल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. चॅपमॅन याने 111 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 13 फोरच्या मदतीने 132 रन्स केल्या. डॅरेल मिचेल याने 76 आणि मोहम्मद अब्बासने 52 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 344 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : निक केली, विल यंग, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मुहम्मद अब्बास, मिचेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, जेकब डफी आणि विल्यम ओरोर्क.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: अब्दुल्ला शफीक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सलमान आघा, तैयब ताहिर, इरफान खान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अली आणि अकिफ जावेद.