प्रज्ञा ठाकूर: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उपस्थितीत मालेगावात (Malegaon News) होणाऱ्या विराट हिंदू संत संमेलनाला (Hindu Sant Sammelan) अखेर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सशर्त परवानगी दिली असून, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही तसेच प्रक्षोभक भाषण न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे मालेगावच्या यशश्री कंपाऊंडमध्ये उद्या (दि.30) गुढीपाडव्याला (Gudi Padwa) दुपारी 1 ते 5 या वेळेत हिंदू संत संमेलन पार पडणार असून त्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
या संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ‘हिंदू वीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी श्री. भारतानंद सरस्वती, ह. भ. प. संग्राम बापू भंडारे, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे, जैन धर्मगुरु निलेशचंद्र महाराज हे देखील उपस्थित राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस व महसूल प्रशासनाने परवानगी नाकारली होती. आयोजकांनी त्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर न्यायालयाने परवानगी दिल्याने आयोजक संमेलनाच्या तयारीला लागले आहेत.
दरम्यान, न्यायालयाने कार्यक्रमास परवानगी दिली असली तरी काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. कार्यक्रम केवळ सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत घेता येईल. आयोजकांनी पोलिसांना लेखी हमीपत्र द्यावे, ज्यात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची खात्री असेल. पोलिसांनी कार्यक्रमासाठी स्वतंत्र मार्ग आखावा आणि तो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. नाशिक पोलिसांनी कार्यक्रमाला सुरक्षा पुरवावी, तसेच त्यासाठी आयोजकांकडून खर्च वसूल करायचा का, याचा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सात जण आरोपी आहेत, ज्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात त्यांना काही प्रमाणात सुट दिली गेली असून, सध्या त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे. त्यांच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..