विशेष – शिल्पकलेतील सुवर्णमुद्रा
Marathi March 30, 2025 10:24 AM

>> राजेंद्र महाजन

पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांना नुकताच `महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला. शिल्पकलेतील त्यांचे योगदान पाहता शंभरी पार केलेल्या या प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वाच्या ऊर्जेसमोर आपण नतमस्तक होतो.

आधुनिक भारतीय कलेत महाराष्ट्रातील शिल्पकारांचे मोठे योगदान आहे. त्यांतील रावबहादूर गणपतराव काशिनाथ म्हात्रे, रघुनाथ कृष्णा फडके, विनायक पांडुरंग करमरकर, बाळाजी वसंत तालीम, वासुदेव विष्णू मांजरेकर, नारायण गणेश पाणसरे, सदाशिव साठे या प्रसिद्ध शिल्पकारांच्या मांदियाळीत पद्मभूषण राम वनजी सुतार यांचे नाव त्यांच्यातील वेगळेपणासाठी घ्यावे लागेल. भारतीय कलेचे सुवर्णपान म्हणून या प्रतिभावंत शिल्पकाराची कला कारकीर्द नेहमीच महत्त्वाची ठरणार आहे.

आज वयाच्या शंभरीतही ते न थकता, दुपारची वामकुक्षी न घेता दररोज आठ ते दहा तास नोएडास्थित स्टुडिओत उभे राहून शिल्पकलेत रममाण असतात. सध्या त्यांच्या स्टुfिडओमध्ये अनेक भव्य शिल्पे निर्माण अवस्थेत आहेत.

महानतेचा अथक प्रवासी राम सुतार यांना पाच-सहा वेळा भेटण्याचा योग आला. शरीरयष्टीने उंचपुरे, भव्य कपाळ, पिंगट वाढत्या वयानुसार कमी झालेले, पण मानेवर रुळणारे केस, अतिशय साधा पेहराव असे हे निगर्वी संवेदनशील व्यक्तिमत्त्व बघता क्षणी मनात ठसते. हे थोर शिल्पकार खान्देशातील धुळेनजीकच्या गोंदुर या छोटय़ाशा खेडय़ात सामान्य विश्वकर्मा सुतार कुटुंबातील. त्यांचे वडील वनजी हंसराज सुतार लाकडाच्या बैलगाडय़ा, टांगा, नांगर व तत्सम पारंपरिक सुतारकाम हा व्यवसाय करायचे. आई सीताबाई घर सारवायच्या, गोवऱया थापायच्या, चूल बनवायच्या. हे सारे छोटे राम बघायचे अन् सारवलेल्या भिंतीवर ते चित्र काढायचे.

बालपणीच्या आठवणीत रमताना ते सांगतात, `न कळत्या वयात विंचू चावला. मी तो मारला, पण मुळातच कलात्मक जाण असल्याने त्यांच्या मृत आकाराने माझे लक्ष वेधले. घरात असलेल्या 501 साबण वडीवर मी लगोलग विंचूचा आकार कोरला व हुबेहूब रंगविलासुद्धा. अशा पद्धतीने माझ्या शिल्पकलेला सुरुवात झाली.’ त्यांना शिक्षणाची उमेद फार होती. गुणग्राहक कलाशिक्षक रामकृष्ण जोशींनी राम सुतारांना कलेच्या उच्च शिक्षणासाठी उद्युक्त केले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे पाठवून त्यांनी सर्वतोपरी मदतही केली. उच्च कलाशिक्षणाला जाण्यापूर्वी इ.स.1947 मध्ये याच गुरुजींच्या प्रेरणेतून त्यांनी सात फूट उंचीचे `बॉडी बिल्डर’ हे सिमेंट माध्यमातील व ग्रीक प्रभावातील शिल्प घडवले. ते शिल्प आजही आपणास नेर, धुळे येथे बघावयास मिळते.

मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून राम सुतार यांनी प्रथम श्रेणीत प्रथम येऊन प्रतिष्ठेचे मेयो सुवर्णपदक पटकावत जी.डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली. या काळात ते एक नम्र प्रतिभावंत कला विद्यार्थी म्हणून कला वर्तुळात परिचित होते. कला विद्यार्थी असतानाच ते रावबहादूर म्हात्रे, वि.पां. करमरकर, खानविलकर या दिग्गज शिल्पकारांच्या स्टुडिओत कामासाठी जायचे. या दरम्यान नेर येथील शाळेत त्यांनी केलेले गांधी शिल्प तर अफलातून कल्पक असे आहे.

शिक्षणानंतर उमेदवारीच्या काळात त्यांनी सन 1954-58 या चार वर्षांत भारतीय पुरातत्त्व विभागात अजिंठा वेरुळ लेण्यांचे जतनीकरण करण्याकामी `मॉडेलर’ म्हणून नोकरी केली. तिथल्या वास्तव्यात त्यांनी अनेक अभिजात शिल्पांची डागडुजी व भरपूर रेखांकने केलीत. त्याद्वारे ती अभिजातता त्यांच्यात भिनत गेली. शासकीय नोकरीत असताना बाह्य शिल्पकामे करता येणार नाहीत, असे वरिष्ठांनी बजावताच स्वाभिमानी शिल्पकार राम सुतार यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ज्या शिल्पामुळे त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला ते शिल्प म्हणजे प्रगती मैदानाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला असलेले 13 फुट उंचीचे सिमेंट काँािढटचे शेतकरी शिल्प व शेतकरी जोडप्याचे शिल्प. वास्तुविशारद जोगळेकरांमुळे संसद भवनात त्यांना सात फूट उंचीचा लाल दगडातील सिंहस्तंभशीर्ष घडवायला मिळाले. भोपाळच्या टागोर भवनातील करंजगावकर या वास्तुविशारदाच्या मदतीने त्यांनी गंगा-यमुना ही शिल्पे घडविली.

राम सुतार सुरुवातीला सिमेंट, काँािढट, दगड, संगमरवर नंतर ते ब्राँझ, फायबर ग्लास या माध्यमांकडे वळले. राजस्थान-मध्य प्रदेश सीमेवरील चंबळ नदीवरील गांधीसागर धरणावर 45 फूट उंचीचे चंबळ देवतेच्या भव्य प्रतीकात्मक शिल्पामुळे ते देशभर प्रसिद्ध झाले. 45 फूट उंचीच्या सिमेंट काँािढटच्या ठोकळ्याला पंधरा महिने रात्रंदिवस स्वतला झोकून देत, अजिंठा वेरुळच्या कलावंताप्रमाणे छिन्नी-हातोडय़ाचे घाव घालत, कोरून भारतीय अभिजात परंपरेशी नाते सांगणारे हे शिल्प त्यांनी उभे केले. बंधुभाव दर्शवणारे हे शिल्प एकमेवाद्वितीय आहे. या व्यतिरिक्त त्यांची संसद भवनात 15 राष्ट्रपुरुषांची भव्य ब्राँझ शिल्पे बघावयास मिळतात. लोकनेता वा अन्य त्यांची हुबेहूब व्यक्तिरेखा घडविणे यांत राम सुतार कोणतीही कसर सोडत नाहीत.

सात फूट उंचीचे सिमेंटचे मॉरिशस येथे असलेली घारापुरी लेण्यातील जगप्रसिद्ध त्रिमूर्ती शिल्प प्रतिकृती, अमृतसर येथील 21 फूट उंचीचे महाराणा रणजीत सिंग यांचे अश्वारूढ शिल्प, लुधियाना गोविंदगढ़ येथील 20 फूट उंचीचे भव्य गंगा-यमुना जलदेवतेचे शिल्प, माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या वीरभूमी समाधी स्थळावरील ब्राँझ पॅनल्स तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ, लखनऊ स्थित स्मारकातील अनेक उत्थित व गोल ब्राँझ शिल्पे, म्युरल्स व अगदी अलीकडील 84 फूट उंचीचे जोरहाट, आसाम येथील ललित बोरफुकन, 90 फूट उंचीचे बेंगळुरू येथील केपनगौडा, 153 फूट उंचीचे चिकबल्लारपूर, कर्नाटक येथील लॉर्ड शिवा ही भव्य व्यक्तिशिल्पे वैशिष्टय़पूर्ण व अनोखी आहेत.

गाथा मंदिर देहू स्थित संत तुकाराम (2007) या सात फूट उंच ब्राँझ शिल्पात त्यांच्या बालपणीच्या हळव्या आठवणी गुंतलेल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे श्रीपेरुम्बुदूर (तामीळनाडू) येथील स्मारक तर प्रतीकात्मक रूपक स्तंभासाठी वैशिष्टय़पूर्ण आहे. धर्म, सत्य, न्याय, त्याग, शांती, विज्ञान व समृद्धीचा विचार सांगणारे हे प्रतीकात्मक स्तंभ सम्राट अशोक स्तंभांची आठवण करून देताना दिसतात. खजुराहो येथील अजरामर शृंगार शिल्पे घडवणाऱया अनामिक शिल्पकारांना `श्रद्धांजली’ हे शिल्प राम सुतारांच्या अफलातून कल्पकशक्तीला सलाम करणारे आहे. शिल्पांचा मुकुटमणी म्हणता येईल ते म्हणजे ब्रह्म सरोवर हरियाणा कुरुक्षेत्र येथील 2008 मध्ये बनविलेले `कृष्ण-अर्जुन गीता संवाद’ हे प्रचंड आकाराचे भव्य आणि दिव्य अजरामर ब्राँझ शिल्प होय. ज्या ठिकाणी कौरव-पांडवांचे घनघोर युद्ध झाले त्या कुरुक्षेत्रावर हे शिल्प विराजमान आहे. आजवरच्या पद्मभूषण राम सुतारांच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कलाकृती म्हणता येईल.

राम सुतार यांचे 2013 ते 2018 दरम्यान नर्मदा सरोवर गुजरात येथे घडवलेले `स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वाधिक 597 फूट उंचीचे व्यक्तिशिल्प आज प्रचंड बहुचर्चित झालेले आहे. जगातील सर्वात उंच शिल्प आपणही बनवावे हे पाहिलेले स्वप्न अशा तऱहेने पूर्ण झालेले बघणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे,’ असे ते म्हणतात. राम सुतारांना कलेच्या अद्वितीय कार्यासाठी भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण तसेच रवींद्रनाथ टागोर सौहार्द पुरस्कार (2016) देऊन त्यांच्या कलेचा गौरव केलेला आहे. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते प्रख्यात इंडियन आर्ट अँड ाढाफ्ट सोसायटी (आयफेक्स), दिल्लीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

शेवटी मुलाखत संपताना, स्वातंत्र्यपूर्व काळातील 22 वर्षे व स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे 78 वर्षे अनुभवलेल्या पद्मभूषण राम सुतारांना झालेल्या बदलाबद्दल व एकंदरीतच प्रदीर्घ जीवनाबद्दल विचारले असता ते म्हणतात, `परिस्थिती बदलली, माणसे बदलली, आधुनिक तंत्रज्ञान आले, गतिमानता आली, पण तेव्हाही मेहनत होती, आताही ती आहेच. निसर्ग फार मोठा खजिना आहे, तो गुरू आहे, डोळे उघडे ठेवा. कलाकाराच्या रूपाला आठवण राहावी म्हणून कलेची सेवा करा. यश, पैसा, प्रसिद्धी आपोआपच मिळत जाईल.’ हे ऐकून आपण स्तब्ध, नतमस्तक होतो.

ह राष्ट्रपिता महात्मा गांधीवर राम सुतार यांची अपार भक्ती होती. त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांनी आयुष्यभर निष्ठेने अंगिकारलेला आहे. सन 1948 ला बनवलेला नेर, जि. धुळे येथील सिमेंटचा `हास्यमुख गांधी’ या अर्ध पुतळ्यापासून ते आजवर त्यांची विविध अवस्थेतील, विविध माध्यमांतील अनेक गांधी शिल्पे बघावयास मिळतात. प्रत्येकातून गांधींचे महानत्व झळकताना दिसते. ते नेहमी म्हणतात, `शिल्पाशय समजून घेण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे. चिंतन, मननाबरोबरच असंख्य आरेखने केली पाहिजेत. तरच तुम्ही त्या व्यक्तित्वाच्या जवळ पोहोचू शकता आणि तरच तुमची शिल्पं रसिकांच्या हृदयाला भिडतील.’ त्यांची गांधींची शिल्पे भारतासह जगभरातील 210 देशांत 450 शहरांत गेलेली आहेत. दिल्ली संसद भवन आवारातील 16 फूट उंचीचे बसलेले `ध्यानस्थ गांधी’ हे ब्राँझ शिल्प तर सर्वोत्तम असेच आहे. गांधी स्मृती स्थळ, दिल्ली येथील 13 उंचीचा ब्राँझ स्मारक समूह अनुभवताना त्यावरील `मेरा जीवन ही मेरा संदेश है!’ हा विचार आपणास नतमस्तक व्हायला भाग पाडतो.

(लेखक चित्रकार, कला अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.