शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले, म्हणाले की…
Marathi March 30, 2025 12:24 PM

मॅनक्राव कोकेटे नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारने अखेर पाणी फेरलंय का? असा प्रश्न आता साऱ्यांना पडला आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, असं राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं दिलेले आश्वासन हवेत विरलंय, अशी चर्चा आहे.

दरम्यान याच मुद्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे हा विषय माझ्या स्तरावरचा नसून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. असे म्हणत राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, असे माझ्या कधी ऐकण्यात आले नाही, असे ही ते यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातील बळीराजाची उपेक्षा झाल्याचे बोलले जात आहे.

शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन माझ्या ऐकण्यात नाही

राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, अशा काही तक्रारी आल्या होत्या. 31 मार्च पर्यंत पैसे मिळतील, असे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार 2 हजार पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांना येत्या 2 ते तीन दिवसात मिळतील. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही, यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. युरिया खत गैरप्रकार बाबत गुन्हा दाखल झाला आहे, त्या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल. महापुरुष यांच्याबाबत वेडेवाकडे चर्चा करू नये आणि आपल्या अकलेचे तारे तोडू नये. याबत कायदा व्हायला पाहिजे, असे माझे देखील मत आहे. मात्र सोयाबीनला कमी दर मिळत नाहीये, अशा तक्रारी आल्या नाहीत असे ही कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले.

पीक कर्जाबाबत काय म्हणालेत अजित पवार?

उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी (ता.28) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची जाहीर सभेत उजळणी करून दाखवली. पवार म्हणाले, पीक कर्जाचे ३१ मार्चपूर्वी पैसे भरा. जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो. यावर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे पीक कर्ज भरा.” असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.