धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय .वांद्रे कोर्टाने दिलेल्या 2 लाखांच्या पोटगीच्या आंतरिम निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात चांगलीच खडाजंगी झाली.करुणा शर्मापासून झालेली मुलं माझी आहेत पण करुणा शर्मांशी अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय. करुणा मुंडेंनीही त्यावर जोरदार प्रतिवाद केलाय.
मुंडेंच्या वकिलाचा युक्तीवाद - धनंजय मुंडेंनी करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नाही
न्यायाधीशांचा सवाल- करुणा मुंडेंच्या 2 मुलांचे वडील कोण?
मुंडेंचे वकील- मुंडेंनी मुलांना स्वीकारलं आहे, पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही
वकील- आमच्याकडे लग्नाचे पुरावे
कोर्टाचा सवाल- मुलं तुमची आहेत मग करुणा त्यांच्या आई कशा नाहीत?
मुंडेंचा वकील- करुणा शर्मांकडे कोट्यावधींची संपत्ती, तरी पोटगीसाठी अर्ज
करुणा शर्मांचे वकील- आम्ही पुरावे देतो, आम्हाला 5 एप्रिलपर्यंत वेळ द्या.
न्यायाधीश- पुढील सुनावणी 5 एप्रिलला होईल
युक्तीवादानंतर करुणा शर्मांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय. धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंपासून झालेल्या मुलांची नावं टाकली आहेत.. मात्र करुणा मुंडेंचा पत्नी असा उल्लेख टाळलाय. त्यामुळे करुणा मुंडे आता इरेला पेटल्या असून त्या धनंजय मुंडेंसोबतच्या लग्नाचे पुरावे देणार आहेत. जर करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले तर थेट धनंजय मुंडेची आमदारकीच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नावरूनच सुरू झालेला हा कौटुंबिक वाद नेमकं काय वळण घेणार? याकडे लक्ष लागलंय.