Santosh Patil : जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या चालणार नाहीत : जिल्हाधिकारी संतोष पाटील; वाहनांची कसून तपासणी करावी
esakal March 30, 2025 01:45 PM

सातारा : जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी सरकार, प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी रेव्ह पार्ट्या चालणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, तसेच पोलिस विभागाने जिल्ह्यातील तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलिस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही. व्ही. पाटील, तसेच अधिकारी उपस्थित होते.

काही औषधांचा वापर नशेसाठी केला जातो, अशी औषधे कोणत्या भागात जास्त विकली जातात याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, याबाबत सविस्तर अहवाल पाठवावा. अवैधरीत्या गांजा व अफूची शेती होणार नाही याची पोलिस विभागाने खबरदारी घ्यावी, तसेच अमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.

जास्तीतजास्त गुन्हे दाखल करा

जिल्ह्यातील मोठी हॉटेल्स, लॉजची पोलिस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. अमली पदार्थ आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करावे. अमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक छापे टाकावेत, जास्तीतजास्त गुन्हे दाखल करावेत. पोलिस विभागाने ड्रग्ज पकडल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून यंत्रसामग्री खरेदी करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.