कऱ्हाड : भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; परंतु लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४० हजार कोटींचा आर्थिक ताण आला आहे. महाराष्ट्र हे आर्थिक शिस्त पाळणारे राज्य असून, वर्षभरात सरकारचे उत्पन्न वाढल्यानंतर त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘राज्याची आर्थिक परिस्थिती एवढीही बिकट नाही; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात विविध विभागांचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्या त्या विभागाचे मंत्री उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देसाई म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जाव्यात, असा माझा प्रयत्न राहील. जेथे ज्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. तेथे त्यांनी लढावे अशी माझी भूमिका आहे. जिल्ह्यातील चार मंत्री, खासदार, आमदार एकत्र बसून निवडणुकीसंदर्भात निर्णय घेऊ. सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढत आहे. महायुती सोडून कोणी बाहेर जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. लवकरच शिवसेनेत जिल्ह्यातील अनेक विविध पक्षांचे पदाधिकारी आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील.’’
दौलतनगरला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सवदौलतनगर (ता. पाटण) येथे १५ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील पहिल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असून, डोंगरी विभागातील खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येणार आहे. फनफेअरमध्ये ८० वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचा अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर घोडेस्वारी, कोयना नदीत वॉटर स्पोर्टस्ची सोय करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर पॅराग्लायलिंगची व्यवस्था करण्यात येईल. मुंबईच्या चौपाटीवर ज्याप्रमाणे बग्गी राईड असते तशी सोय येथेही करण्यात येणार आहे. १७ एप्रिलला संध्याकाळी महाराष्ट्राची लोककला राज्यातील नामवंत मराठी कलाकार तेथे येऊन सादर करतील. त्या कार्यक्रमाअगोदर कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, श्वान प्रदर्शन, महिला बचत गट यातील विजेत्यांचा सन्मान होणार आहे.