आमिर खाननंतर सयाजी शिंदेंनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट, मस्साजोगमध्ये जाणारा पहिला मराठी अभिनेता; कुटुंबीयांचं सांत्वन
GH News April 01, 2025 04:10 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर या हत्येमागचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत असतानाचा अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून अनेकजण धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा:  पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू

संतोष देशमुख प्रकरणात नवी माहिती

कळंब शहरामध्ये एका घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मनीषा कारभारी बिडवे असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून करण्यात आला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘कळंबमध्ये जी महिला मृत अवस्थेमध्ये आढळून आली, तपासाअंती तिचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी अद्याप कोणताही संबंध आढळून आलेला नाहीये. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, जर या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आढळला तर त्याची माहिती दिली जाईल.’

मनिषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव आहे, तिची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महीलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आले असून, लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीला पकडलं जाईल असं संजय पवार यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.