आयपीएल 2025 स्पर्धेत मिस्ट्री गर्ल कायम चर्चेत असतात. सध्या जास्मिन वालियाची चर्चा रंगली आहे. ब्रिटीश गायिका आणि टीव्ही प्रेझेंटर जास्मिन वालिया आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीतून ती मुंबई इंडियन्स आणि खासकरून हार्दिक पांड्याला पाठिंबा देताना दिसली आहे. सोमवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान जास्मिन देखील दिसली होती. या सामन्यानंतरचा संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.स्टेडियममध्ये हार्दिक आणि मुंबई इंडियन्स संघाला जास्मिन चीअर करताना दिसली. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बसमध्येही दिसली. विशेष म्हणजे, फक्त क्रिकेट संघ आणि त्यांचे जवळचे मित्र या बसमध्ये बसू शकतात. आयपीएल फ्रेंचायझी हॉटेलपासून स्टेडियम किंवा एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासासाठी खेळाडूंच्या बससह कुटुंबियांसाठीही व्यवस्था करते. सामन्यानंतर जास्मिन वालिया खेळाडूंचा कोचिंग स्टाफ आणि कुटुंबिय प्रवास करत असलेल्या बसमध्ये बसली.
बसमध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे कुटुंबिय चढत होते. जास्मिनच्या आधी दीपक चाहरची पत्नी जया भारद्वाज बसमध्ये चढली. त्यानंतर जास्मिन तिच्या मागोमाग बसमध्ये चढली. जास्मिनने एक लांब काळा ड्रेस घातला आहे आणि बसच्या मागच्या सीटवर बसली. जास्मिन बसमध्ये चढल्याने हार्दिक आणि तिच्या नात्याबद्दल चर्चांना आणखी जोर मिळाला आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी चार वर्षांचा संसार मोडल्याचं घोषित केलं होतं. दोघांनी इंस्टाग्रामवर याबाबतची घोषणा करत वेगळं होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हार्दिक पांड्या जास्मिन वालियासोबत दिसत आहे.
जास्मिन वालिया भारताच्या मोठ्या सामन्यांमध्येही उपस्थित होती. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही तिने हजेरी लावली होती. जास्मिन वालियाने गाणं आणि टेलिव्हिजन कारकिर्दीद्वारे मनोरंजन क्षेत्रात एक एक ठसा उमटवला आहे. तिचं बॉम डिगी गाणं खूपच लोकप्रिय झाले आहे. तसेच विविध रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. हार्दिक पांड्यासोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यापूर्वी जास्मिन वालियाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात तिच्या बाजूला टॅटू असलेला हात दिसला होता. तेव्हाही तो हार्दिक पांड्या असावा अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या दोघांनीही या नात्याबाबत अधिकृत काहीच सांगितलं नसून या फक्त सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चा आहेत.