GT vs MI: मुंबई इंडियन्सला 'ती' चूक भोवली अन् हरला सलग दुसरा सामना, कर्णधार हार्दिक पांड्यानं मान्य केलं
esakal March 30, 2025 01:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (२९ मार्च) मुंबई इंडियन्स संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादला झालेल्या हंगामातील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभूत केले.

मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले होते. त्यामुळे दोन सामन्यांनंतरही मुंबई इंडियन्सच्या खात्यात अद्यापही शून्य पाँइंट्स आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्याचेही पुनरागमन झाले होत. त्याने या सामन्यातील पराभवामागील कारणही स्पष्ट केले आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजरातने २० षटकात ८ बाद १९६ धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली.

तसेच शुभमन गिलने ३८ आणि जॉस बटलरने ३९ धावांची खेळी केली. सुरुवातीला या तिघांनी केलेल्या या धावा महत्त्वाच्या ठरल्या. कारण शेवटी गुजरातची फलंदाजी कोलमडली होती. मुंबईकडून गोलंदाजीत कर्णधार हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर मुंबईला १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ६ बाद १६० धावाच करता आल्या. त्यांच्याकडून सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तिलक वर्माने ३९ धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी करताना प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

या पराभवानंतर म्हणाला, 'एकत्र करून पराभवाचे कारण सांगते कठीण आहे. मला वाटते फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्हाला १५-२० धावा कमी पडल्या. आम्ही मैदानात योग्य खेळू शकलो नाही. खूप सोप्या चूका केल्या, त्यामुळे २०-२५ धावांचा फटका बसला. टी२० क्रिकेटमध्ये या धावा खूप असतात.'

'गुजरात टायटन्सचे सलामीवीर खूप चांगले खेळले. त्यांनी खूप संधी आम्हाला दिल्या नाहीत. ते फार जोखीमी शॉट्स न खेळता धावा करत होते. तेव्हापासूनच आम्ही सामन्याचा पाठलाग करत होतो. याक्षणी आम्ही सर्वांनीच जबाबदारी घेण्याची गरज आहे, तरी अद्याप ही स्पर्धेची सुरुवात आहे. फलंदाजांनी मोठ्या धावा केल्या पाहिजेत, आशा आहे की लवकरच त्या होतील.'

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टीबद्दल तो म्हणाला, 'अशा खेळपट्ट्यांवर स्लोअर बॉल्स कठीण असतात. काही थेट येता, काहींना उसळी मिळते, फलंदाज म्हणून हे कठीण दिसते. गुजरात गोलंदाजीने जे करू शकत होते, ते त्यांनी केले. '

दरम्यान, मुंबईला तिसरा सामना घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये ३१ मार्च रोजी खेळायचा आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळवला जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.