Eknath Shinde : मेट्रो थेट बदलापुरात: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच; निधीची तरतूद
esakal March 30, 2025 03:45 PM

कल्याण : ठाणे, भिवंडी, कल्याणपर्यंत येणारी मेट्रो खडकपाड्यातून थेट बदलापूरपर्यंत पुढे जाणार आहे. यासाठीच्या निधीची एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याने आरामदायी प्रवासाचे बदलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

एमएमआर क्षेत्रातील मेट्रो सेवा आणि रस्ते प्रकल्प पूर्ण करण्यावर एमएमआरडीएने भर दिला आहे. याच अनुषंगाने अर्थसंकल्पात मेट्रो - ५ आणि मेट्रो-१२ या दोन प्रकल्पांसाठी ३ हजार ५८० कोटींचा निधी मंजूर आहे. तर ठाणे-भिवंडी-कल्याणपर्यंत येणाऱ्या मेट्रोच्या मार्गात बदल करून खडकपाडामार्गे थेट बदलापूरपर्यंत जाणार असल्याचे ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासाठी १ हजार ५८० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

ठाणे-भिवंडी टप्प्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून कल्याण-भिवंडी टप्प्याचे काम शिल्लक आहे. जून २०२९ पर्यंत बदलापूरपर्यंतचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी एमएमआरडीएने अर्थसंकल्पात देखील निधीची तरतूद केली असल्याने बदलापूरकरांसाठी वाहतुकीचा नवी पर्याय उपलब्ध होणार आहे.

कल्याणशी संबंधित दोन्ही मेट्रो मार्ग दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण होतील. या मार्गांसाठीची तरतूदही अर्थसंकल्पात आहे. या मार्गांची पूर्तता होण्यासाठी सध्या कोणतीही अडचण नाही, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.