
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यावरून सध्या राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील कर्जमाफीवरून अजित पवार व महायुती सरकारला धारेवर धरलं आहे.
”अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची विधानसभा निवडणूकीपूर्वीची भाषा वेगळी होती. लाडक्या बहिणींना पैसे देण्यापासून ते शेतकरी कर्जमाफी देणारच असं ते सांगत होते. च वर त्यांचा जोर होता. आता त्यांची भाषा बदलली आहे. आता त्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा द्यायला हवा. जर ते लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील, तर महाराष्ट्रातील जनतेने राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी स्वत: नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
”अजित पवार यांच्या युतीने कर्जमाफी व लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा केली तेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते. त्यामुळे ही नैतिक जबाबदारी त्यांची होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी एक कराव की जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बाहेर उपोषणाला बसेन असं सांगावं आणि त्यांनी उपोषणाला बसावं. ते स्वत:ला जनतेचे नेते आहेत, बहिणींचे लाडके भाऊ, शेतकऱ्यांचे लाडके पुत्र सांगतात ना मग त्यांनी दाखवून द्यावे की मी वचनाला किती पक्का आहे. प्राण जाये पर शान ना जाये ही एका शिवसैनिकाची, मराठा मावळ्याची भूमिका असते. तुमच्या डोळ्यासमोर शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून, अजित पावारांच्या दारात बसून आंदोलन करा. आंदोलन हा शिवसेनेचा आत्मा आहे, तुमच्याकडे नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वत:ला शिवसैनिक मानता ना मग बसा उपोषणाला, असे आवाहन संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केले.