पट्टणकोडोली : येथे गुढीपाडव्याचा निमित्ताने गाव भागातील बस स्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहाटे ३ च्या सुमारास चबूतऱ्यासह शिवप्रेमींनी पुतळा बसवला. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. तसेच शिवरायांचे गीत आणि घोषणा देत शिवप्रेमीनी परिसर दणाणून सोडला.
घटनास्थळी हातकणंगले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, तलाठी रविशंकर राजगिरवाडे, ग्रामविकास अधिकारी टी. हणमंते, पोलीस पाटील मोहन वर्धन उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे पट्टणकोडोली येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी होती. मात्र, प्रशासनाच्या परवानग्या आणि इतर बाबींमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होऊ शकत नव्हता. दरम्यान शिवप्रेमीनी परवानगी न घेता हा पुतळा बसवल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावर पट्टणकोडोली ग्रामपंचायत प्रशासनाने पुतळा देखाभालीची जबाबदारी घेतली.
याला सरपंच अमोल बाणदार यांनी ज्या कागदपत्रांची गरज असेल त्यास आम्ही सहकार्य करू असे पोलीस आणि शिवप्रेमीना सांगितले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. पुतळा कोणत्याही परवानगीशिवाय बसवल्याने पोलीस उपनिरीक्षक समिरसिंह साळवे यांनी माझ्या अख्त्यारीत असलेल्या भागात अशाप्रकारे घटना घडत असेल तर मी शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना नेते मुरलीधर जाधव यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत दिला. यावर मुरलीधर जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत पुतळा काढणार नसल्याचा इशारा दिला. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
मागील ४० वर्षांपासून गावात पुतळा बसावा अशी मागणी होती. मात्र, काही प्रशासकीय अडचणीमुळे हा पुतळा बसवण्याचे काम रखडले होते. आज पहाटे शिवप्रेमीनी हा पुतळा बसवला आहे. प्रशासनाला विनंती आहे आम्ही पुतळा बसवला आहे. पुढच्या काही दिवसात परवाने घेतले जातील. सार्वजनिक बांधकाम विभागाला कसला अडथळा नाही. गावाला अडथळा नाही. पोलीस प्रशासनाने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही या दबावाला बळी पडणार नसून पुतळा असाच ठेवणार आहे.
मुरलीधर जाधव, माजी जिल्हाप्रमुखगावात मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. याला ग्रामपंचायत प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य असेल. कागदपत्रांची पूर्तताही करण्यात येणार आहे. पुढच्या ४ दिवसात ग्रामसभा घेऊन बसवल्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात येणार आहे.