नागपूर : शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये ७७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण ८१ अपघातांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०० जणांनी प्राण गमावले होते, त्यामुळे या वर्षी अपघात २२ टक्क्याने आणि मृत्यू १८ टक्क्याने घटले, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.
शहरात वाहनचालकांचा बेशिस्तपणा, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतची उदासीनता आणि वर्दळीच्या भागांतील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असली तरी विनाहेल्मेट, रॉंग साइड वाहतूक आणि भरधाव वेगामुळे अपघातांचे प्रमाण अद्याप मोठे आहे.
गेल्यावर्षी शहरात जानेवारी ते डिसेंबर ३४५ नागरिकांचा अपघातात बळी गेला होता. त्यात सर्वाधिक बळी हे हिंगणा, एमआयडीसी आणि शहरातील सीताबर्डी परिसरात गेले. विशेष म्हणजे, त्यातील १०० बळी हे जानेवारी ते मार्चदरम्यान अपघातात गेल्याची माहिती समोर आली.
नागपुरातील अपघात आणि त्यातील जखमींची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही संख्या कमी करण्यावर वाहतूक पोलिसांकडून वर्षभरापासून विविध उपक्रम आणि अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यातून अपघातावर नियंत्रण मिळविता येणे शक्य झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
वाहतूक पोलिसांचे उपाय किती यशस्वी?गेल्या वर्षभरात ‘मिशन जीवन रक्षा’ अंतर्गत वाहतूक पोलिसांनी रात्र गस्त, रेडियम पट्ट्यांचा वापर, ब्लॅक स्पॉट सुधारणा, रंबलर स्ट्रिप्स आणि सिग्नल यंत्रणांमध्ये सुधारणा केली. यामुळे काही प्रमाणात अपघात कमी झाले असले, तरी मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखण्यात अपेक्षित यश मिळाले नाही.
एमआयडीसी अपघातांचा ‘हॉटस्पॉट’शहरातील एमआयडीसी परिसर हा अपघातांचा सर्वात धोकादायक ठिकाण ठरला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत येथे २४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी २१ पुरुष आणि ३ महिला होत्या. गेल्या वर्षी याच भागात १८ जणांनी प्राण गमावले होते. इंदोरा आणि कामठी हे अपघातप्रवण क्षेत्र ठरत असून, अनुक्रमे १८ आणि १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत इंदोरा विभागात मृतांचा आकडा वाढला आहे.
अशी आहे आकडेवारी (२०२४)
विभाग प्राणांतिक मृत्यू
अपघात
अजनी १८ १९
एमआयडीसी १६ १८
कामठी १५ १६
इंदोरा १२ १३
सक्करदरा ९ ९
सीताबर्डी ७ ८
सदर ६ ६
सोनेगाव ४ ५
लकडगंज ३ ३
कॉटन मार्केट १ २
अशी आहे आकडेवारी (२०२५) विभाग प्राणांतिक मृत्यू
अपघात
एमआयडीसी २२ २४
इंदोरा १७ १८
कामठी १२ १३
अजनी ८ ८
सदर ५ ६
लकडगंज ४ ४
सक्करदरा ४ ४
सीताबर्डी ३ ३
कॉटनमार्केट १ १
सोनेगाव १ १