लखमापूर- दिंडोरी - वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातात आई-वडिलांच्या निधनाला सहा दिवस उलटत नाही, तोच गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीनेही उपचार सुरू असताना शनिवारी (ता. २९) अखेरचा श्वास घेतला. काळजाला पाझर फोडणाऱ्या या घटनेने बर्डे परिवारासह नातेवाईक व करंजवण गावावर शोककळा पसरली आहे.
करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे (वय ४३), पत्नी सुरेखा सतीश बर्डे (४०) व मुलगी समृद्धी सतीश बर्डे (१७) हे तिघे कारने (एमएच ०१ डीवाय ०६९१) निळवंडी येथून नातेवाइकांकडून आपल्या करंजवण गावी परतत असताना सोमवारी (ता. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या कारला वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काट्याजवळ समोरून येणाऱ्या राधे ट्रान्स्पोर्टचा आयशर टेम्पो (एमएच ०५ एफजे ८१८८) धडक दिली.
त्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती-पत्नी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. जखमी समृद्धी हिच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
समृद्धी तब्बल पाच दिवस मृत्यूशी झुंज देत होती. ती बरी व्हावी, यासाठी सर्वच स्तरातून प्रार्थना सुरू होती. मात्र शनिवारी (ता. २९) आई-वडिलांच्या निधनाला सहा दिवस उलटत नाही, तोच समृद्धीने देखील अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण बर्डे परिवारासह नातेवाईक व ग्रामस्थ शोकसागरात बुडाले असून, हळहळ व्यक्त होत आहे. करंजवण येथे शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला.