राज ठाकरे: मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले पालिका सभागृह भरलेले नाही. महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘प्रति महापालिका’ सुरु करण्याचा निर्धार राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.
याबाबत मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, काही ठिकाणी तीन वर्ष, काही ठिकाणी पाच वर्ष होत आलेत, महापालिका अस्तित्वात नाही. महापालिका दोन चाकांवर चालते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. यातलं एक चाक पूर्णपणे पंक्चर झाले आहे, त्या एका चाकाची वाट लागली आहे. एका चाकावर गाडी चालू आहे, त्यामुळे ती गाडी पलटते. आता गाडी रुळावर आणण्यासाठी ही संकल्पना सुरू करत आहोत. मुंबईतल्या लोकांना समस्यांवर आम्हाला बोलायचं आहे. फेक प्रॉब्लेमवर बोलायला अनेक जण आहेत. कबरी, कामरा असे अनेक मुद्दे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रति सभागृह राज्य सरकारच्या विरोधात असणार का? असे विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, कोणाच्या विरोधात हे सभागृह नाही, समस्यांवरच हे सभागृह असेल. एखादं वाक्य आम्ही बोललो तर हे कोणाच्या विरोधात आहे किंवा कोणाच्या सोबतच आहे, असं निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला आरोप-प्रत्यारोप करायचं नाहीये? लोकांच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मनसेचा भाजपला पाठिंबा आहे की नाही? असे विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, पाठिंबा व्यक्तीला नाही भूमिकेला दिलेला असतो. कुठल्या पक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही, त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊ. महापालिका निवडणूक एकत्र लढायच्या की नाही हा आत्ताचा विषय नाही. जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा बघू. राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली होती. याबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, आशिष शेलार यांच्यासोबत माझी वैयक्तिक दुश्मनी नाही. आशिष शेलार राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका करत होते. एखादी पॉलिसी किंवा विचार पटला नाही आणि टीका केली तर हे समजू शकतो. जर तुम्ही राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करणार तर तुमच्यावर ही वैयक्तिक टीका होऊ शकते. हा मेसेज आम्ही दिला आहे. आमच्याकडून हा विषय आता संपला आहे, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..